भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. नितीशकुमार भाजपच्या पाठिंब्यामुळं सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसले असले तरी यापूर्वी याच भाजपवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती हेही तितकंच खरं होतं. बिहारच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी मोदींवर एक गाणं लिहिलं होतं.

“बहती हवा सा था वो
गुजरात रे आया था वो
काला धन लाने वाला था वो
कहाँ गया उसे ढुंडो
हमको देश की फिकर सताती
वो बस विदेश के दौरे लगाता….

असं उपहासात्मक गीत माध्यमांसमोर गायलं आणि त्यातून त्यांनी मोदींची खिल्ली उडवली होती. पण राजकारणच ते. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो, हे आता सिद्ध झालं आहे. बिहारमधील राजकीय चित्र पाहिलं तर ते स्पष्टपणे दिसून येतं. ज्या मोदींची नितीशकुमार यांनी खिल्ली उडवली होती आता त्यांच्याच पाठिंब्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. नितीशकुमार यांनी बुधवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती, हा अनपेक्षित धक्का होता. पण त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच मोदींनी नितीशकुमाराच्या या निर्णयाचं कौतुक करत जे काही ट्विट केलं होतं ते पाहून हळूहळू बिहारच्या राजकारणातलं बदललेलं चित्र स्पष्ट होऊ लागलं. राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर अवघ्या १२ तासांमध्ये नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी गुरुवारी सकाळी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांना विश्वासदर्शक मतदानात १३१ मते पडली.