ही प्रेमकहाणी आहे एक गाय आणि बैलाची. अनेक वर्षांपासून दोघं एकत्र होते. पण अचानक एक दिवस गायीची विक्री करण्यात आली. विक्रीसाठी गायीच्या मालकाने मिनी ट्रकमध्ये गायीला चढवलं, पण हे बैलाला सहन झालं नाही.

बैलाचं नाव मंजामली, तर गायीचं नाव लक्ष्मी आहे. तामिळनाडूच्या मदुराई येथील ही घटना आहे. मंदिराच्या परिसरात चहा विक्री करणाऱ्या मुनियांदी नावाच्या एका व्यक्तीने या दोन्ही गाय आणि बैलाची लहानपणापासून देखभाल केली. तो बैल पालामेदू मंदिराचा आहे. त्याच्यासोबतच मुनियांदी याची गाय लहानाची मोठी झाली. पण लॉकडाउनमध्ये मुनियांदी याला आर्थिक चणचण जाणवू लागली.

आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्याने आपल्या लक्ष्मी या गायीची २० हजार रुपयांमध्ये विक्री केली. गायीला घेऊन जाण्यासाठी त्याने तिला मिनी ट्रकमध्ये चढवलं. पण हे दृष्य मंजामलीने बघितलं, त्याला हे सहन झालं नाही. त्यानं गाडीसमोर उभं राहून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. पण थोड्यावेळाने गायीला घेऊन जाणारी गाडी सुरू होताच त्याने थेट त्या गाडीच्या मागे धाव घेतली. तब्बल एक किलोमीटरपर्यंत हा बैल त्या गाडीचा पाठलाग करत होता. अखेर थकल्यानंतर त्याने गाडीचा पाठलाग करणं सोडलं. पण, या सर्व घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन कोणीतरी सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबतची माहिती तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांचा मुलगा जयप्रदीप याला मिळाली. त्यानंतर जयप्रदीपने लक्ष्मी गाय खरेदी करणाऱ्याचा शोध घेतला आणि त्याच्याकडून गाय परत विकत घेतली व त्या मंदिराला दान केली, यासोबतच मंजामली आणि लक्ष्मी पुन्हा एकत्र आले.
पाहा व्हिडिओ :-

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.