CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही लोक करोनातून बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तानातील बहुतांश लोकांचा रोजगार हा रोजंदारीवर असल्यामुळे लॉकडाउन करणं शक्य नसल्याचं पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. मात्र करोनाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला सध्या अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आहे. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आपली जबाबदारी ओळखत गरजू व्यक्तींना मोफत अन्नधान्याचे वाटप करत आहे. तो त्या संदर्भातील फोटो आणि अपडेटदेखील ट्विटरवरून साऱ्यांना देत आहे.

पाकिस्तानात तो जे सहकार्य करत आहे, त्या कामाची स्तुती करण्यात येत आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी फलंदाज युवराज सिंग यानेही त्याच्या कार्याची स्तुती केली आहे. त्या दोघांनी ट्विट करत आफ्रिदी करत असलेल्या कामाचे कौतुक केले असून त्याला या कार्यात मदत करण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे.

मात्र आफ्रीदीला मदत करण्याचा सल्ला देणं या दोघांना चांगलंच महागात पडलं आहे. नेटिझन्सनी या दोघांना या प्रकारावरून फैलावर घेतल्याचं दिसून आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आफ्रिदीने आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत, करोनामुळे पाकिस्तानमधल्या सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली होती. अनेकांना अन्नधान्य, सॅनेटायजर, टिश्यू या सारख्या गोष्टी मिळत नसल्याचं आफ्रिदीने सांगितलं होतं. याच कारणासाठी आपण आपल्या लगतच्या खेड्यांमध्ये मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचं आफ्रिदीने सांगितलं होतं.