भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या अहमदाबाद कसोटीत टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याला लक्षवेधी कामगिरी करता आली नसली तरी सोशल मीडियाच्या मैदानात मात्र त्याची चांगलीच चर्चा आहे. याला कारण आहे यष्ट्यांमागून पंतची होणारी ‘कॉमेंट्री’. ऋषभ पंतने अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यष्ट्यांमागून थेट पंचांकडेच मजेशीरपणे पैशांची मागणी केली, त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंत अंपायर अनिल चौधरी यांच्यावरच मजेशीर कमेंट करताना दिसला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील २१ व्या षटकात पंतने स्टंपवरील बेल्स योग्यपणे लावल्या, हे खरंतर मैदानावरील अंपायरचं काम असतं. ऋषभ पंत बेल्स लावत असताना अंपायर अनिल चौधरी त्यांना समोरुन निर्देश देत होते. बेल्स बरोबर लागल्यावर चौधरी पंतला थम्सअप दाखवून इशारा देतात, पण त्यावर “पैसे दो मेरे” अशी मजेशीर मागणी पंत करतो. स्टंपच्या माइकजवळ बोललेलं त्याचं हे वाक्य ऐकून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रहाणेलाही हसू आवरत नाही.


दरम्यान, दोन्ही संघातील अखेरचा कसोटी सामना 4 मार्च रोजी सुरू होणार आहे. हा सामना जिंकल्यास टीम इंडिया ही मालिका 3-1 अशा फरकाने खिशात घालेल.