जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ग्रीसमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत सुट्ट्या व्यतीत करत आहे. ग्रीसमधल्या एका आलिशान हॉलेटमध्ये  कुटंबिय आणि मित्रपरिवारासोबत तो थांबला होता. यावेळी विशाल हृदयाच्या ख्रिस्तियानोनं तब्बल १६ लाखांची टिप हॉटेल कर्मचाऱ्यांना दिली आहे. ख्रिस्तानियोच्या या टिपची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘द सन’च्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या सेवेवर खूश होऊन ३३ वर्षांच्या रोनाल्डोनं कृतज्ञता व्यक्त करत चेक सुपूर्त केल्याचं संबधित वृत्तपत्रानं म्हटलं आहे. नुकतीच ‘फोर्ब्स’नं जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली होती या यादीत ख्रिस्तियानोचाही समावेश होता.

‘फिफा वर्ल्डकप’मध्ये पोर्तुगालचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसात ख्रिस्तियानोनं ‘रियाल माद्रिद’ या क्लबला रामराम ठोकला. रोनाल्डो आता इटलीच्या युवेंटस संघाकडून नवी इनिंग सुरु करणार आहे. रोनाल्डोसाठी युवेंटस क्लबनं ११७ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मोजली. २००९ साली रोनाल्डो रियाल माद्रिद संघात दाखल झाला होता, त्यावेळी तो जगातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता. ३३ वर्षीय रोनाल्डोनं गेल्या नऊ वर्षात रियाल माद्रिदसाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

युवेंटस संघाकडून खेळणार असल्याची घोषणा झाल्यानंतर युवेंटस संघानं रोनाल्डोची ‘सीआर-7’ जर्सीची फर्स्ट कॉपी ऑनलाईन विकायला काढली होती. एक दिवसात पाच लाखांहून अधिक जर्सी ऑनलाईन विकल्या गेल्या तर क्लबलच्या अधिकृत स्टोअरमधून २० हजारांहून अधिक जर्सीचा खप झाला होता.