लडाखमध्ये भारतीय जवान व चिनी सैन्यामध्ये उफळलेल्या वादानंतर, दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत. याचे पडसाद भारतीय बाजारपेठेतही पाहायला मिळाले, विविध सणांच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी येणाऱ्या चिनी बनावटीच्या वस्तूंवर दुकानदरांसह नागरिकांकडून बहिष्कार टाकला गेल्याचे दिसून आले. यामुळे चीनचे बरेच आर्थिक नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. तर, आता अनेक व्यापारी संघटना देखील यंदाच्या दिवाळीत चीनला आर्थिक दणका देण्याची तयारी करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चिनी मालावर बहिष्कार घालावा यासाठी सोशल मीडियावर विविध प्रकारचे मेसेज देखील पाठवले जात आहेत. यात सांगितले जात आहे की, चीन भारतीय नागरिकांना नुकसानदायक ठरतीय असे फटाके व सजावटीसाठी वापरले जाणारे लाइट्स भारतात पाठवत आहे.

या मेसेजचे सत्य काय आहे? हे आपण जाणून घेऊयात. पीआयबीच्या पडतळणीत या व्हॉट्स अॅप मेसेजचे सत्य समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.

सत्य काय आहे –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, चीन भारतात असे फटाके व सजावटीसाठीचे लाइट्स पाठवत आहे, ज्यामुळे लोकांना दम्याचा त्रास उद्भवू शकतो. शिवाय, यामुळे डोळ्यांशी निगडीत आजार देखील पसरतील. केंद्र सरकारची संस्था पीआयबीने जेव्हा या व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा असे समोर आले की, गृहमंत्रालयाकडून अशाप्रकारची कोणतीही सूचना केली गेलेली नाही. गृहमंत्रालयाच्या कोणत्याच अधिकाऱ्याने चीनहून फटाके व लाइट्स पाठवले जात असल्याचा दावा केलेला नाही.

पाकिस्तान व चीनचा कट असल्याचा मेसेजमध्ये दावा –

या मेसेजमध्ये गृहमंत्रालयाचे वरिष्ठ तपास अधिकारी विश्वजीत मुखर्जी यांच्या हवाल्याने म्हटले गेले की गुप्तरच विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तान थेट भारतावर हल्ला करू शकत नाही, म्हणून त्यांनी भारताचा बदला घेण्याची चीनकडे मागणी केली आहे. चीनने भारतात दमा पसरवण्यासाठी विशेष फटाके तयार केले आहेत. हे कार्बन मोनोऑक्साइड सारखा विषारी धूर सोडतात. याशिवाय भारतात नेत्र रोग वाढवण्यासाठी विशेष प्रकारचे सजावट लाइट्स देखील बनवले जात आहेत. यामध्ये मोठ्याप्रमाणावर पारा वापरला गेला आहे. मेसेजमध्ये सल्ला देण्यात आला आहे की या चिनी उत्पादनांचा वापर करू नका.

मेसेज फॉरवर्ड करण्या अगोदर सत्यता पडताळा-

पीआयबीचे म्हणने आहे की, लोकांनी अशाप्रकारच्या खोट्या मेसेजपासून सावध रहावे व हे मेसेज पुढे पाठवण्याअगोदर त्याची सत्यता पडताळून घ्यावी. भारतात राखीपोर्णिमेपासून ते दिवाळीपर्यंतच्या उत्सव काळात स्थानिक बाजारपेठांमध्ये मोठ्याप्रमाणावर चिनी वस्तूंची आयात होत असते. अंदाजे दिवाळीमध्ये भारतात ४० हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री होते. तर, ‘सीएआयटी’ या व्यापारी संघटनेने म्हटले आहे की, यंदाच्या दिवाळीत भारतीय व्यापारी स्थानिक उत्पादनांनाच विक्रीसाठी प्राधान्य देणार आहे. यामुळे चीनला एकप्रकारे इशारा मिळणार आहे.