पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवर सर्वाधिक सक्रीय असणारे नेते आहे. भारतात सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत मोदी अव्वल आहेत. नुकतंच एका ट्विटर युजरनं मोदींना आपल्या ट्विटमध्ये मेन्शन करत चेहरा हसत ठेवण्याचा सल्ला दिला. आश्चर्य म्हणजे या ट्विटला उत्तर देत तुमच्या सल्ल्याचा नक्की विचार करू असं ते म्हणाले.

ट्विटरवर एका युजरनं मोदीजी तुम्ही फार क्वचित हसता. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मात्र तुम्ही चेहरा हसरा ठेवला पाहिजे असा सल्ला दिला. यावर खुद्द पंतप्रधान मोदींनी ट्विट करत या सल्ल्याचा नक्की विचार करु असं उत्तर दिलं. इतकंच नाही तर अनेक ट्विटला त्यांनी उत्तर दिलं आहे. एका शालेय मुलीचंदेखील त्यांनी आपल्या ट्विटमधून कौतुक केलं आहे.

अनंत सुब्रमण्यम् नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं. त्यांच्या लहान मुलीनं मोदींच्या स्वच्छ भारत मोहीमपासून प्रेरणा घेत एक निबंध लिहिला होता. या निबंधांचं कौतुकही मोदींनी केलं.