रोज कामावरुन थकून घरी गेल्यानंतर कोणीतरी मालिश करुन दिली तर किती बरं वाटले असा विचार प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. मात्र पालाकांच्या नशिबी हे सुख नसतं. ऑफिसमधली कामं संपवून घरी गेल्यानंतर घरची कामं आणि मुलांना संभाळण्यातच वेळ निघून जातो. मात्र जपानमधील एका स्मार्ट वडिलांनी मात्र मुलांना खेळवणे आणि स्वत:ची मालिश करुन घेण्यासाठी एक भन्नाट उपाय शोधला आहे. जपानमधील या व्यक्तीने लावलेली शक्कल नेटकऱ्यांना भलतीच आवडली आहे.

ऑफिसमधून थकून घरी आल्यानंतर मुलांबरोबर खेळताना अनेकदा मुलं त्यांची खेळणी पालकांच्या अंगावर फिरवतात. हेच लक्षात घेऊन गुगलमध्ये काम करणाऱ्या केन कावामाटो या व्यक्तीने खेळण्यातील रेल्वे गाडीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक सारखे ट्रॅक एका पांढऱ्या टी-शर्टच्या मागच्या बाजूला छापून घेतले आहेत. त्यामुळे घरी आल्यानंतर केनची मुले त्याच्या अंगावर खेळण्यातल्या रेल्वे गाड्या फिरवण्याऐवजी त्याने घालतलेल्या या टी-शर्टवरील ट्रॅकवर फिरवतात. केनच्या या कल्पनेमुळे एकीकडे मुलांचेही मनोरंजन होते तर दुसरीकडे केनला मोफत मालिश करुन मिळते. केनने लावलेली ही शक्कल नेटकऱ्यांच्या पसंतीस पडली आहे.

यासंदर्भात बोअर्ड पांडा या वेबसाईटशी बोलताना केनने, ‘माझ्या मुलाला रेल्वे गाड्या आणि रेल्वे ट्रॅकची प्रचंड आवड आहे’ असे सांगितले. मुलाची रेल्वे गाड्यांची आवड लक्षात घेऊनच टी-शर्टवर उजवा खादा, डावा खांदा, मणका, पाठ अशी नावे या ट्रॅकवरील स्थानकांना दिली आहेत. ‘माझ्या मुलाला माझ्या पाठीवरील रेल्वे ट्रॅकवर खेळण्यातली रेल्वेगाडी चालवायला आवडते. तो माझाच एखाद्या खेळण्यासारखा वापर करतोय,’ असं केन हसतच सांगतो.

याआधीही केनने मुलाची रॉक क्लायम्बिंगची आवड लक्षात घेऊन वॉल ग्रिप्स असणारे टी-शर्ट तयार केले होते.

गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या केनची ही कल्पना अनेक पालकांना प्रेरणा देणारी आणि एकाच वेळी मुलांना संभाळणे आणि मालिश मिळणे अशी दोन्ही कामे होत असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.