झोपायच्या वेळेला येणारे डास आणि त्यामुळे होणारी चिडचिड नेहमीचीच. मग या डासांमुळे होणारे डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजार. त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम या सगळ्यांपासून सुटका होण्यासाठी काही बड्या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गूगलतर्फे एक अनोखे तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे.  रॅकेटच्या साह्याने, डास मारण्याचे औषध लावून किंवा वेळप्रसंगी फॅनचा आधार घेऊन डासांना पळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यासाठी करावी लागणारी धडपड अनेकदा राग आणणारीच असते. मात्र यावर काही ठोस उपाय आल्यास जगभरातील नागरिकांची डासांच्या त्रासापासून सुटका होणार आहे. यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गूगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेट ही कंपनी अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागासोबत काम करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे डासांचा नायनाट करण्यासाठी एकत्रितरित्या काम करुन नवे हायटेक उपकरण बनविण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

ऐकलं का? १५ वर्षांच्या मुलाने केले ७३ वर्षांच्या वृद्धेशी लग्न

मायक्रोसॉफ्ट कंपनी एडिस इजिप्ती या डासाला पकडण्यासाठी टेक्सासमध्ये एक ट्रॅप बनविण्याचे काम करत आहे. या डासांमुळे डेंग्यू होत असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. मात्र या स्मार्ट ट्रॅपमुळे किटक विज्ञान शास्त्रज्ञांना मदत होणार असून, साथीच्या आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या मशिनचा आकार पक्ष्यांच्या पिंजऱ्याएवढा असून, त्यामध्ये विविध उपकरणे लावण्यात आली आहेत. यात रोबोटिक्स, इन्फ्रारेड सेन्सर आणि मशीन लर्निंग आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग यांचा समावेश आहे. या सर्व उपकरणांच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी डासांवर नजर ठेऊ शकणार आहेत.
पारंपरिक मच्छरदाण्यांमध्ये डास पकडले जातात. मात्र ते एकत्र होत असल्याने त्यांचे प्रकार ओळखण्यासाठी शास्त्रज्ञांना जास्तीचे कष्ट घ्यावे लागतात. मात्र आता या नव्या उपकरणामुळे हे काम सोपे होणार असून, डासांच्या प्रकारानुसार त्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. त्या विशिष्ट किटकाचे फिचर, त्या किटकाची पंख फडफडविण्याची पद्धत आणि त्याची पडणारी सावली याचा विचार शास्त्रज्ञ करणार आहेत.

विमान लँड होण्याआधीच माथेफिरु प्रवाशाने उघडले दार

हे उपकरण तयार करणाऱ्या मायक्रोसॉफ्ट इंजिनिअर ईथन जॅक्सनने सांगितले. या नव्या उपकरणामुळे ८५ टक्के डास अचूकपणे शोधता येणार आहेत. या उपकरणाच्या माध्यमातून तापमान आणि वातावरणाची सद्यस्थिती यांचीही नोंद घेता येणार आहे. या महितीवरुन डास दिवसाच्या कोणत्या वेळेत जास्त अॅक्टीव असतात याची नोंद घेता येणार आहे. याशिवाय डासांची नसबंदी करता येणे शक्य होणार आहे. मात्र यामध्ये डासाचे लिंग ओळखणे हे सर्वात मोठे आव्हान असेल असेही या शास्त्रज्ञाने सांगितले. मात्र हे उपकरण प्रत्यक्षात येण्यास आणखी काही वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.