घरगुती साधने घ्यायचा विचार करत असाल तर आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे. कारण १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याने घरगुती उपकरणांच्या किंमतीत वाढ होणार आहे. इतकेच नाही तर वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या या सर्व उपकरणांच्या किंमती सणवारांच्या आधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता कंपनीकडे असणारा कच्चा माल संपल्यानंतर कंपन्या इनपुट क्रेडिटनुसार सुधारित किंमती लागू करणार आहेत.

आता विक्रेत्याला २५ ते २७ टक्के कर भरावा लागत होता. मात्र जीएसटी करप्रणालीमुळे हा कर २८ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही विक्रेते आपले उत्पन्न वाढविण्याचा विचार करत असताना हा कराचा बोजा स्वतःवर न घेता तो ग्राहकांकडून घेण्याच्या प्रयत्न करतील. त्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढवणे हा एकच पर्याय विक्रेत्याकडे असेल.

यासाठी जीएसटी लागू होण्याआधी मोठमोठ्या कंपन्यांनी आपले रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, ओव्हन, टीव्ही, मोबाईल यांसारख्या उपकरणांच्या किंमती कमी केल्याचे चित्र होते. आता सगळ्या कंपन्या आपल्या जीएसटीनंतरच्या किंमतींबाबत अभ्यास करत असून सोमवारपासून या उपकरणांच्या किंमती साधारणपणे निश्चित केल्या जातील. त्यानंतर ग्राहकांना ही उपकरणे नव्या किंमतीने उपलब्ध होतील.