धरमशालाच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात श्रीलंकने ७ गडी राखून भारताला पराभवाचा धक्का दिला. भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीत फार काही करता आलं नाही. सुदैवानं महेंद्रसिंह धोनीच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर ११३ धावांचे आव्हान ठेवले. ही धावसंख्या श्रीलंकन संघासमोर अगदी तुटपुंजीच होती. पण, १० चौकार २ षटकार लगावत धोनीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. धोनीनं आपल्या दमदार खेळीमुळे आपल्या चाहत्यांचं मन जिंकलं, पण त्याचबरोबर आपल्यातील उत्तम कौशल्यगुण दाखवून धोनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

खेळासोबत मैदानातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे त्याचं किती बारीक लक्ष असतं हे धोनीनं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. सामन्यादरम्यान ८ बाद ८७ धावा अशी भारतीय संघाची केविलवाणी अवस्था होती. यावेळी धोनी आणि बुमराह खेळपट्टीवर होते. पण, बुमराह फार काळ टिकला नाही. तो बाद झाला निराश होऊन बुमराह तंबूत परतू लागला. पण, धोनीला हा निर्णय पटला नाही. त्यानं लगेच रिव्ह्यू मागवला. विशेष म्हणजे अम्पायरने बोट उंचावण्या आधीच रिव्ह्यूसाठी धोनीनं अपिल केलं. थर्ड अंम्पायरानं बुमराहला नॉट आऊट दिले. रिव्ह्यू मागवण्याचा धोनीचा निर्णय इतका योग्य होता की त्याची निर्णय क्षमता पाहून सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यानिमित्तानं ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील डायलॉग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘चिते की चाल, चील की नजर और धोनी के DRS पे कभी संदेह नही करते’ अशा प्रकारचे मेसेज या छोट्याश्या व्हिडिओबरोबर व्हायरल होत आहेत.