रस्त्यावर कचरा टाकू नये असं अनेकदा अनेकांना सांगितलं जातं. मात्र त्यानंतरही अनेकदा लोक रस्त्यावर कचरा टाकताना दिसतात. अशाप्रकारे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एका व्यक्तीला लहान मुलाने चांगलाच धडा शिकवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक वर्षाचा लहान मुलगा दिसत आहे. या मुलाचे नाव सून जियारुई असं असून हा व्हिडिओ शॅनडाँग प्रांतातील असल्याचे समजते. रस्त्यावरुन चालताना बाजूने जाणाऱ्या गाडीतून चालकाने प्लास्टिकची बाटली बाहेर फेकली. त्यानंतर या मुलाने ती बाटली उचलून खिडकीमधून पुन्हा त्या चलकाच्या हातात दिली. या सर्व घटनेचा व्हिडिओ या लहान मुलाच्या आईने शूट केला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी या लहान मुलाची आई जिंग लूलू यांनी या कृतीमगे वेगळे कारण असल्याचे शक्यता व्यक्त केली आहे. ‘गाडीमधील व्यक्तीच्या हातून ही बाटली खाली पडल्याचे त्याला वाटले असल्याने त्याने बाटली पुन्हा या व्यक्तीच्या हातात दिली असेल. तो केवळ एक वर्ष तीन महिन्याचा असल्याने त्याला पर्यावरण संरक्षण वगैरेची समज नाहीय. मात्र त्याच्या कृतीने चालकाला नक्कीच धडा शिकवला,’ असं जिंग लूलू यांनी म्हटलं आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन या मुलाकडून मोठ्या व्यक्तींनीही शिकण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जिंग यांना आपल्या लहनामुलाचे व्हिडिओ शूट करण्याची सवय आहे. असाच एक व्हिडिओ शूट करताना हा प्रकार घडला.