मांजर मेली, ‘नासा’ने वाहिली श्रद्धांजली… हेडिंग वाचून अचंबित झाला असाल… पण ती होतीच तशी. लपलपणारी जीभ, लहान खुऱ्या चणीची आणि मोठ्या डोळ्यांची. ही तिच्या लूकची ओळख. मात्र खरी ओळख अशी की तिचे चाहते तब्बल 67 लाख. सोशल मीडियावर तिचं अकाउंट. लाखो तिचे फॉलोअर्स…

इंटरनेटवर नेहमी चर्चेत राहणारी आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारी अमेरिकेतील ‘लिल बब’ (Lil Bub) या मांजरीनं रविवारी अखेरचा श्वास घेतला. केवळ आठ वर्षांच्या ‘लिल बब’चे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूबवर 67 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या मांजरीच्या नावाने वेबसाईट आणि ऑनलाइन शॉपिंग स्टोअरदेखील आहे. टीव्ही चॅनलवर देखील या मांजरीचे अनेक शो झालेत.

Lil Bub चे मालक माइक ब्रिडावस्की यांनी सोमवारी तिच्या मृत्यूबाबत माहिती दिली. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिताना ब्रिडावस्की यांनी, “लिल बब सोबतचं माझं अखेरचं छायाचित्र. शनिवारी रात्री ती आनंदात झोपली होती. पण रविवारी सकाळी आम्हाला जाग येण्याआधीच ती कायमची झोपी गेली. तिच्या प्रकृतीबाबत सर्वांनाच कल्पना होती. सातत्याने तिला हाडांच्या जंतू संसर्गाने ग्रासलं होतं” असं म्हटलंय. प्राण्यांच्या संवर्धनासाठी सात लाख डॉलरचा निधी (चॅरिटी) जमवण्यात तिने मदत केल्याचंही ब्रिडावस्की यांनी सांगितलं. तर, या सोशल मीडियावरील लोकप्रिय मांजरीला श्रद्धांजली वाहताना, “प्रिय बब… अंतराळात भेटू, तुझा प्रवास सुखाचा होवो” अशी भावूक पोस्ट नासाने इंस्टाग्रामवर केली आहे. याशिवाय, लिल बबचे जवळपास 67 लाख चाहतेही तिच्या निधनाने दुःखी झाले असून विविध भावूक पोस्टद्वारे तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

2011 साली एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ब्रिडावस्की यांच्या एका मित्राला लिल बब सापडली होती. लिल बब हिला अनुवांशिक आजाराने ग्रासलं होतं. तिला हाडाच्या जंतू संसर्गाने ग्रासलं होतं, त्यामुळे तिची वाढही खुंटली होती. तरीही सोशल मीडियावर मात्र लोभस दिसण्यामुळे ती प्रचंड प्रसिद्ध होती. कदाचित त्यामुळेच साक्षात आंतरराष्ट्रीय अवकाश संस्था ‘नासा’नेही बब हिला इंस्टाग्रामवर श्रद्धांजली वाहिलीये.


“प्रिय बब… अंतराळात भेटू, तुझा प्रवास सुखाचा होवो” अशी भावूक पोस्ट नासाने इंस्टाग्रामवर केली आहे.