तुम्ही कधी माडाच्या झाडावर कोणाला चढताना पाहिलंत का? किती मेहनत आणि कौशल्य लागतं त्या झाडावर चढण्यासाठी. इतर झाडांवर चढायचं झालं तर किमान फांद्यांचा आधार तरी असतो त्याच्या मदतीने वर तरी चढता येतं पण नारळाच्या झाडावर चढणं म्हणजे सगळ्यात कठीण काम. एकतर कशाचा आधार नाही आणि चढताना छोटी चूक झाली आणि पाय घसरला की हात पाय मोडण्यापासून जीव जाण्यापर्यंतचा धोका असतो. माड सरळ चढायचं झालं तरी भल्या भल्यांना घाम फुटतो तिथे हा माड उलटं चढायचं म्हणजे साक्षात आपला नाश ओढवून घेण्यासारखंच आहे. तेव्हा असा शहाणपणा करण्याच्या भानगडीत कोणी पडणार नाही. पण हरियाणाच्या या गड्याची बातच काही और आहे. हा गडी डोळे झाकून माडाचे झाड चढू शकतो, पण त्याचबरोबर उलट दिशेनेही तो माड चढून अगदी टोकापर्यंत पोहोचतो.

आता हे तो कसं करतो यासाठी तुम्हाला व्हिडिओच पाहावा लागले. मुकेश ३२ वर्षांचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो माडाच्या झाडावर चढत आहे. पण सरळ चढत जाण्यापेक्षा उलट्या दिशेने हे झाड चढण्याचं खूळ त्याच्या डोक्यात शिरलं. मग काय पठ्ठ्याने अनेक महिने याचा सराव करून पाहिला. आधी उलट दिशेने दोन तीन फूटांचे अंतर पार करणारा मुकेश या कलेत एवढा निपुण झाला की आता तो उलट दिशेनेही तो सहज माडाच्या टोकापर्यंत पोहोचतो. अशा प्रकारे तो पाच मिनिटांत पन्नास फुटांपर्यंत वर जाऊ शकतो असा दावा त्याने केला आहे. आता आपली ही कला ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दाखवून त्याला नवा विक्रम करायचा आहे. सध्या बांधकाम कामगार म्हणून तो काम करत आहे.