बँकेच्या लॉकरमध्ये पैसे सुरक्षित असतात असं तुम्हाला वाटतं असेल तर ही बातमी वाचून तुम्ही लॉकरमधील पैसे खरोखरच सुरक्षित असतात या संदर्भात पुन्हा एकदा विचार कराल. वडोदऱ्यामधील एका व्यक्तीने आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या पैशांना चक्क वाळवी लागल्याची घटना समोर आली आहे. रेहान कुतुबुद्दीन देसरावाला या व्यक्तीने आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये दोन लाख २० हजार रुपये ठेवले होते. प्रताप नगरमधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतील लॉकरमध्ये हे पैसे ठवण्यात आलं होतं. बँकेतील लॉकर क्रमांक २५२ मध्ये ठेवण्यात आलेल्या या नोटांना वाळवी लागली. वाळवीने या नोटा खावून फस्त केल्या असून रद्दीतील पेपरांप्रमाणे आता या नोटांचे केवळ अवशेष शिल्लक आहेत.

लॉकरमधील नोटांना वाळवी लागल्याचे समजल्यानंतर या ग्राहकाने बँकेच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली आणि बँकेने ही झालेली नुकसानभरपाई द्यावी. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे नोटांना वळवी लागल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. मात्र यासंदर्भात बँकेच्या व्यवस्थापनाने एक अधिकृत पत्रक जारी केलं आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी, “ही अगदीच अशक्यप्राय वाटणारी घटना आमच्या वडोदऱ्यामधील प्रताप नगरच्या शाखेत घडली आहे. एका ग्राहकाने ठेवलेल्या नोटांच्या गड्ड्यांपैकी काही नोटांना वाळवी लागली. आम्ही बँकेच्या सर्व खातेदारांना हे आश्वासित करु इच्छितो की यासंदर्भात बँकेने तातडीने निर्णय घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही ठोस पावलं उचललं आहे. बँक परिसरामध्ये औषध फवारणी करण्यात आली असून असा प्रकार पुन्हा होणार नाही यासंदर्भात खबरदारी घेतली जाईल. आम्ही या प्रकरणामध्ये संबंधित ग्राहकाची तक्रार नोंदवून घेतली असून यासंदर्भात पुढे काय करता येईल याबद्दल लवकरच निर्णय घेऊन,” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- RBI खरंच बाद करणार का 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा? सरकारने दिलं स्पष्टीकरण

बँकेकडून यासंदर्भात चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात येत असलं तरी या घटनेमुळे बँक लॉकरच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या कोणत्याही वस्तूंसाठी बँक जबाबदार नसते. अगदी चोरी किंवा दरोडा पडला तरी या वस्तुंची जबाबदारी बँकेवर नसते असं आरबीआयच्या नियमांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.