पाकिस्तानी पत्रकार हे दोन शब्द वाचल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ते नाव म्हणजे चाँद नवाब. काही वर्षांपुर्वी ईदच्या दिवशी पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाबचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आपल्या अतरंगी रिपोर्टिंगमुळे चर्चेत आलेले चाँद नवाब इतके प्रसिद्ध झाले की, बॉलिवूडनेही त्यांची दखल घेतली होती. चाँद नवाब याच्यानंतर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानमधील तौबा तौबा करणारा पत्रकार चांगलाच चर्चेत आला होता. मात्र आता पाकिस्तानमधील एक स’खोल’ वृत्तांकन करणार पत्रकार चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे या पत्रकाराने चक्क मानेपर्यंत उंचीच्या पाण्यात उभं राहून वृत्तनिवेदन केलं आहे. या पत्रकाराचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये जोरदार पाऊस सुरु असून मुसळधार पावसामुळे पंजाबमधील अनेक भागांमध्ये पूर आला आहे. या पुराचे वार्तांकन करण्यासाठी जी-टीव्ही न्यूज या वृत्तवाहिनीचा पत्रकार अझदार हुसैन अगदी मानेपर्यंतच्या पाण्यामध्ये उतरुन पूरपरिस्थिती सांगताना दिसत आहे. या वर्तांकनामध्ये पंजाब आणि आजूबाजूच्या भागामध्ये सिंधू नदीला पूर आल्याने शेतजमीनी पाण्याखाली गेल्याचे हुसैन सांगताना दिसत आहे. पाण्याच्या वर केवळ हुसैन यांचे डोके आणि वृत्तवाहिनीचा बूम एवढ्याच गोष्टी दिसत आहेत.

जी-टीव्ही न्यूजने युट्यूबवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘पुराच्या पाण्यात पाकिस्तानी पत्रकार, स्वत:चा जीव धोक्यात टाकून तो वृत्तांकनाचे काम करतोय,’ असं हेडिंग या व्हिडिओला वृत्तवाहिनीने दिले आहे.

हा व्हिडिओ ट्विटवरही व्हायरल झाला असून त्याला एक लाख ३१ हजारहून अधिक हिट्स मिळाले आहेत.

मात्र अनेकांनी या अशा विचित्र रिपोर्टींगवर प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच या वृत्तवाहिनीने पत्रकाराचा जीव संकटात घातल्याप्रकरणी त्यांना जाबही विचारला आहे. तर काहींनी वृत्तवाहिनीला आणि पत्रकारालाही ट्रोल केलं आहे.

हे धोकादायक आहे

स’खोल’

त्यासाठी नका सिलेक्ट करु

बुडालो तर नाहीय…

पावसाळ्यातील सर्वोत्तम कर्मचारी

पगार वाढवण्यासाठी

हा बसला तर नाहीय

दरम्यान, असे वृत्तांकन न करता केवळ पाणी दाखवले असते तरी चालले असते असं मत अनेकांनी नोंदवलं आहे. नेटकऱ्यांमध्ये मतप्रवाह असला तरी या एका व्हिडिओमुळे हा पत्रकार चर्चेचा विषय ठरला हे मात्र खरं.