मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २७०२ झाडं कापण्यासाठी परवाणगी देण्यात आल्यानंतर अनेकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. याच विषयावरुन मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत असणारी शिवसेना आणि राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत असणाऱ्या भाजपामध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने झाडं कापण्याचा प्रस्तावाला विरोध केला आहे तर भाजपाने या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे कारशेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे. मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम असल्याची भूमिका युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केली होती. मात्र एकीकडे सत्तेत असताना दुसरीकडे विरोध करत आदित्य ठाकरे मुंबईकरांना वेड्यात काढत असल्याचे आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी ट्विटवरुन केला आहे. त्यांनी आरेमधील वृश्रतोडीला विरोध दाखवत शिवसेना मुंबईकरांच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याचा आरोप करताना मेनन यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या ट्विटसमध्ये त्यांनी #PappuThackeray हा हॅशटॅग वापरला. त्यामुळे सोमवारी रात्री हा हॅशटॅग भारतात ट्विटवरील टॉप ट्रेण्ड होता.

मेनन यांनी ट्विटवरुन शिवसेना-भाजपा युतीवर आरे कॉलीनीतील वृक्षतोड करण्यावरुन टीका केली आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईमध्ये केवळ रियल इस्टेट आहे. त्यामुळेच त्यांनी लोढा यांना शहराध्यक्ष केले आहे,’ असा आरोप मेनन यांनी ट्विटवरुन केला आहे. तसेच मेनन यांनी यावरुन आदित्य ठाकरेंनाही सुनावले आहे. ‘आदित्य ठाकरे हे तर या शहरातील आहेत. त्यामुळे ते आरे वाचवतील अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेनेची कृती भाजपाला पाठिंबा देणारीच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पप्पू ठाकरेंनी मुंबईकरांना वेड्यात काढणे आता बंद करायला हवे,’ असे मेनन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मेनन यांनी #PappuThackeray हा हॅशटॅग वापरुन ट्विट केल्यानंतर अनेकांनी हा हॅशटॅग वापरुन आरे कारशेड विषयावरुन सुरु असणाऱ्या राजकारावर आक्षेप नोंदवला. यामध्ये काहींनी आदित्य ठाकरेंच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर काहींनी राज्य सरकारवर टीक केली. हा हॅशटॅग इतक्या जणांनी वापरला की तो भारतामध्ये टॉप ट्रेण्डींग हॅशटॅग ठरला.

इतकचं नाही मेनन यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान केलं आहे. आरेतील मेट्रोचे काम थांबवून दाखवा नाहीतर तुम्ही पप्पूच आहेत हे सिद्ध होईल असं मेनन एका ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

मेनन यांनी आदित्य यांना पाच प्रश्न केले आहेत.

सामाजिक कार्यकर्ता हरीश अय्यर यांनीही हा हॅशटॅग वापरुन केलेल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंना मुंबई महापालिका तुमच्या पक्षाची सत्ता आहे याची आठवण करुन दिली. ‘जर पालिकेत तुमची सत्ता आहे तर शिवसेनेचे वाघ आरे विषयावरुन डरकाळ्या फोडताना का दिसत नाहीत? की आता वाघांना जंगलांची चिंत राहिलेली नाही?,’ असा सवाल अय्यर यांनी केला आहे. तर अन्य एका ट्विटमध्ये अय्यर यांनी, ‘आदित्य ठाकरे केंद्रात, राज्यात, मुंबईत तुमचीच सत्ता आहे. त्यामुळे जर तुम्ही आरे विषयावरुन मुंबईकरांची दिशाभूल करत असाल तर तुम्ही पप्पू आहात,’ असा टोला लगावला आहे.

अनेकांनी हा हॅशटॅग वापरल्याने तो मुंबई आणि देशभरात टॉप ट्रेंडींग विषय ठरला.

तसेच मेनन यांनी रिट्विट केलेल्या अभिजित दिपके यांच्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंना काही प्रश्न विचारण्यात आले आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोणत्यात पक्षाचे आहेत?, मुंबई महापालिकेमध्ये कोण सत्तेत आहे?, आदित्य ठाकरेंना आरेची एवढी चिंता असेल तर ते त्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या मंत्र्यांना आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांना का यासंदर्भात आदेश देत नाहीत? असे सवाल या ट्विटमध्ये करण्यात आले आहेत.

हाच हॅशटॅग वापरुन करण्यात आलेले इतर ट्विटस पाहुयात…

एकीकडे उद्धव ठाकरे मेट्रो भवनचे उद्घाटन करता तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आरेतील एकाही झाडाला हात लावू देणार नाही असं सांगतात

दरम्यान, याआधीही मेनन यांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केले होते. त्यावेळेही हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला होता. मात्र सोमवारी या हॅशटॅगची देशभरात चर्चा झाल्याचे पहायला मिळाले.