सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, एक नव्हे तर तीन तीन चक्रीवादळांना चकवा देत पायलटनं विमानाचं सुखरूप लँडिंग केलंय. चक्रीवादळापुढे कोणाचाही निभाव लागणं अवघड आहे. पण असं असताना रशियातल्या एका पायलटनं मात्र विमान धावपट्टीवर उतरवलं आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.

सोची विमानतळावर लँड होण्यापूर्वी या विमानाच्या मार्गात एक नव्हे तर तीन तीन चक्रीवादळ घोंघावत होते. तेव्हा या वादळातून मार्ग काढत पायलटनं विमानातल्या सर्व प्रवाशांना सुखरुप स्थळी पोहोचवलं. विमानातले सारे प्रवासी निसर्गाचं रौद्र रुप पाहून थक्क झाले होते. यातल्या काही प्रवाशांनी याचं व्हिडिओ शुटिंगही केलं.

चक्रीवादळानं अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली होती, तर काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते. पण ऐनवेळी मार्गात चक्रीवादळ निर्माण झाल्यानं पायलट पुढं मोठं आव्हानं होतं. एक छोटीशी चूक देखील महागात पडली असती पण डोक शांत ठेवत पायलटनं मात्र आपला सारा अनुभव पणाला लावून विमान सुखरूप खाली उतरवलं. यातल्या जवळपास सर्वच प्रवाशांनी निसर्गाचं हे रुप कधीही पाहिलं नसेल, तेव्हा या निमित्तानं का होईना एक वेगळाच थरार  त्यांना  अनुभवता आला. अनेक प्रवाशांनी याचे व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.