16 September 2019

News Flash

तिसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या नवऱ्याला दोन पत्नींनी ऑफिस बाहेर दिला चोप

तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या एका २६ वर्षीय व्यक्तीला त्याच्या दोन पत्नींनी मिळून मारहाण केली.

(संग्रहित छायाचित्र)

तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या एका २६ वर्षीय व्यक्तीला त्याच्या दोन पत्नींनी मिळून मारहाण केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. २०१६ साली या माणासने पहिले लग्न केले. पण लग्नानंतर काही दिवसातच त्याचे पहिल्या पत्नीबरोबर खटके उडू लागले. तो तिला मारहाण करायचा. नवऱ्याकडून रोज होणारा हा छळ सहन होत नसल्याने तिने नवऱ्याचे घर सोडले व आई-वडिलांकडे निघून गेली.

त्यानंतर संबंधित इसमाने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. याचवर्षी एका घटस्फोटीत महिलेबरोबर त्याने लग्न केले. लग्न जुळवणाऱ्या वेबसाइटच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. लग्नानंतर काही दिवसांनी त्याने दुसऱ्या पत्नीचा सुद्धा छळ सुरु केला. तिच्याकडे सतत हुंडयाची मागणी करायचा. रोजच्या त्रासाला कंटाळून दुसरी पत्नी सुद्धा त्याला सोडून गेली. मागच्या आठवडयात दोन्ही बायकांना त्यांचा नवरा तिसरे लग्न करण्यासाठी मॅट्रीमोनियल साइटवर मुलगी शोधत असल्याचे कळले.

सोमवारी दोन्ही महिला नवऱ्याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात जाऊन पोहोचल्या. कोईमबतोरमधील रासीपालायम येथील एका खासगी कंपनीत त्यांचा नवरा नोकरीला आहे. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी दोन्ही महिलांना प्रवेशद्वारावरच रोखले. त्यांना आत सोडण्यास नकार दिला. दोन्ही महिलांनी प्रवेशद्वारावरच गोंधळ घातला. बाहेर काय सुरु आहे हे पाहण्यासाठी नवरा बाहेर आला तेव्हा दोघींनी मिळून त्याला चोप दिला. सुलूर पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांनी नवऱ्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.

 

First Published on September 11, 2019 12:26 pm

Web Title: planning to marry for 3rd time man thrashed by 2 ex wives dmp 82