पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडियाच्या वापरावर सरकारी तिजोरीतून कोणत्याही प्रकारचा खर्च झाला नाही, असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर दिले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी माहिती अधिकाराखाली यासंबंधीची माहिती मागितली होती. मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोशल मीडियावर आतापर्यंत किती खर्च झाला, याची माहिती मागवली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय आहेत. पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर कायम अपडेट असतात. फेसबूक, ट्विटर यासह लिंकडिन, यू-ट्यूब, गुगल प्लस या सोशल मीडियावरील व्यासपीठांवर सक्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावरील हजारजबाबीपणाबाबत प्रसिद्धही आहेत. एखाद्या मुद्द्यावर मोदी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर कमी, पण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. या माध्यमातून आपण थेट जनतेशी जोडले जात आहोत, असे अनेकदा पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी याचा अॅपही ५० लाखांवर डाऊनलोड करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील सक्रियतेवरून नरेंद्र मोदींवर विरोधकांकडून टीकाही होते. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमत्री मनीष सिसोदिया यांनी मोदींच्या सोशल मीडियावरील वापरावर किती खर्च करण्यात आला, याची माहिती माहिती अधिकाऱांतर्गत पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली होती. लोकसभा निवडणुकीनंतर सोशल मीडियावर केलेल्या खर्चाची त्यांनी माहिती मागितली. पंतप्रधान कार्यालयानेही सिसोदियांना उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियावरील वापरावर एका रुपयाचाही खर्च झाला नाही. पीएमओ अॅपही मोफत बनवण्यात आला आहे. नरेंद्र मोदी अॅपही गुगलच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींचा फेसबुक पेज भाजपचा मीडिया सेल सांभाळत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडियाच्या वापरावर कोणताही खर्च होत नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे.