करोनाच्या साथीमुळे जगभरातील अनेक देशामधील व्यवहार ठप्प झाले आहेत. हवाई वाहतूक, सागरी मार्गाने होणाऱ्या वाहतुकीचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार पहायला मिळत आहे. आता वैज्ञानिकांना असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पहिल्यांदाच आढळून आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी एक प्राणी हा जगातील सर्वात लांब प्राणी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियामधील संशोधकांना खोल समुद्रात वेगवेगळ्या प्रकारच्या समुद्रातील प्राण्यांच्या ३० प्रजाती सापडल्या आहेत.

तज्ज्ञांना ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला असणाऱ्या समुद्रामध्ये पाण्याच्या पृष्ठभागाच्या खालच्या थरामध्ये सर्वात लांब आकाराच सायफोनोफोर सापडला आहे. सायफोनोफोर हे साप किंवा अळीसारखे दिसणारे समुद्री जीव असतात. सायफोनोफोर हे हायड्रोझोअन्सपासून बनलेले असतात. प्राण्यांच्या वर्गीकरणानुसार सायफोनोफोर हे फायलम न्सीडेरिया (phylum Cnidaria) प्रकारात मोडतात. जगामध्ये १७५ प्रकारचे सायफोनोफोर असल्याचे सांगितले जाते. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेला आलेला सायफोनोफोर हा आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा सायफोनोफोर आहे. या सायफोनोफोरची लांबी १५० फूट किंवा ४६ मीटर असल्याचा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. सध्या ब्लू व्हेलला जगातील सर्वाधिक लांबीचा म्हणून ओळखले जाते. ब्लू व्हेलची लांबी ९१ फूट किंवा २५ मीटर असते.

एखाद्या दोऱ्याप्रमाणे असणारे हे सायफोनोफोर उडत्या तबकडीच्या (युएफओच्या) आकारामध्ये पाण्याच्या खालच्या थरामध्ये पसरलेले असतात. सायफोनोफोर हे खोल पाण्यामधील भक्षक समजले जातात. जेलीफिशप्रमाणे सायफोनोफोर सुद्धा आपल्या तंतूसारख्या अवयवाने (tentacles) पाण्यावर तरंगत अन्न गोळा करतात.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया म्युझियमच्या (डब्ल्यूएएम) संशोधकांच्या नेतृत्वामध्ये हे संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनामध्ये आतापर्यंत कधीही नोंद न झालेल्या अनेक प्रजाती सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया म्युझियमच्या ट्विटर हॅण्डलवरुनही यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. “वेस्टर्न ऑस्ट्रेलिया म्युझियमच्या संशोधकांना हा प्राणी सापडला आहे. त्यांच्या माहितीप्रमाणे हा जगातील सर्वाधिक लांबीचा प्राणी असू शकतो. अपोलेमिया सायफोनोफोरची (Apolemia siphonophore) लांबी १२० मीटर असल्याचा अंदाज आहे. मात्र अद्याप त्याची लांबी अधिकृतपणे मोजण्यात आलेले नाही,” असं डब्ल्यूएएमने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ट्विटमध्ये लांबीचा उल्लेख करण्यात आला असला तरी ‘डब्ल्यूएएम’मधील संशोधक असणाऱ्या डॉक्टर नेरीडा विल्सन यांनी संशोधकांनी या सायफोनोफोरच्या लांबीबद्दल कोणताच अंदाज व्यक्त केलेला नाही असं स्पष्ट केलं आहे. “आम्ही या प्राण्याच्या लांबीबद्दल कोणतीच शक्यता व्यक्त केलेली नसून आम्हाला ही लांबी योग्य पद्धतीने मोजण्यासंदर्भात काम करत आहोत. हा समुद्रात सापडलेला सर्वाधिक लांबीचा प्राणी असू शकतो,” असं विल्सन यांनी सांगितलं.