‘पो’ आणि ‘पायाव’ या दोन नद्यांच्या मुखांमधील दलदलीच्या, पाणथळ जागेत व्हेनिस शहर उभे आहे. अगदी लहानलहान ११७ बेटांनी बनलेले प्राचीन शहर लहान कालवे आणि त्या कालव्यांवरील पुलांनी एकमेकांना जोडले गेले आहे. या शहरात १७७ लहान मोठे कालवे आहेत. सुरुवातीला आक्रमकांपासून संरक्षण म्हणून येथील कालवे जतन केले गेले. पुढे वाहतुकीचे रस्ते बांधण्याऐवजी कालव्यांमधूनच जलवाहतूक सुरू झाली. संपूर्णपणे कालव्यानं वेढलंल्या या स्वप्नवत सुंदर शहरातले कालवे आता पूर्णपणे आटले आहेत. वर्षभरात झालेल्या कमी पावसामुळे या कालव्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे व्हेनिस शहरातल्या प्रसिद्ध ‘गोंडोला’ बोटी आता दलदलीत उभ्या आहेत.

दरवर्षी कोट्यवधी पर्यटक या शहरात येतात. गोंडोला बोटीने रात्रीच्या वेळी इथल्या कालव्यामधून दोन्ही काठांवरच्या झगमगत्या प्रासांदाच्या बाजूने फेरफटका मारणे हा अविस्मरणीय आनंद असतो. परंतु आता मात्र कालवे आटल्यानं इथला पर्यटन व्यवसायही काहीसा मंदावला आहे. ‘गोंडोला’ बोटीतून या सुंदर शहराचं दर्शन घेता न आल्यानं विदेशी पर्यटकनही काहीसे नाराज झाले आहे. काही संकेतस्थळांच्या माहितीनुसार हे कालवे आटण्याची ही तिसरी वेळ आहे.

चौथ्या शतकात हूण टोळ्यांचा प्रमुख अटिला तत्कालीन रोमन साम्राज्यावर चालून गेला त्या वेळी त्याने अ‍ॅड्रिअ‍ॅटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले संपन्न अ‍ॅक्विलिया शहर उद्ध्वस्त केले. त्या वेळी त्याच्या हिंसाचारातून वाचलेले लोक जवळच्या पाणथळ, दलदलीच्या प्रदेशात पळून गेले. पाणथळ जागेत मोठे मोठे खांब ठोकून त्यावर या लोकांनी झोपडय़ा बांधून तिथे वस्ती केली. या ठिकाणी पहिल्यांदा राहायला आलेले लोक व्हेनिटी जमातीचे असल्यामुळे या वस्तीला आणि पुढे शहराला ‘व्हेनेशिया’ ऊर्फ ‘व्हेनिस’ नाव पडले . पुढे रस्ते बांधण्याऐवजी या शहरात कालव्यांमधूनच जलवाहतूक सुरू झाली. परंतू कालवे आटल्यानं ही वाहतूक आता ठप्प झाली आहे