आपल्या आवडत्या सुपरहिरोसारखी शक्ती यावी असं त्याच्या प्रत्येक चाहत्याला वाटत असतं. पडद्यावरच्या जगात हे सुपरहिरो तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध स्टंट करत असतात. मात्र त्याच्या चाहत्यांना या सुपरहिरोंची इतकी भुरळ पडलेली असते की आपणही असे काही करु शकतो असे त्यांना वाटतं. पडद्यावरील आणि खऱ्या आयुष्यातील अंतर विसरुन हे चाहते असं काही करायला जातात की त्यातून दुखापत होण्याची शक्यता होते. असाच काहीसा प्रकार ब्राझीलमध्ये घडला आहे.

ब्राझीमधल्या एका विनोदी कलाकाराने सुपरमॅनचे कपडे घालून हाताने चालत्या बसला थांबण्याचा प्रयत्न करत व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसनं त्याला धडक दिल्यानं त्याची फजिती झाली. सुदैवानं त्याला फारसे लागले नाही.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ‘सुपरमॅन’ नावाने ओळखला जाणाऱ्या लुईज रिबेरो डी अँड्रेडने बस अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला बसचा धक्का बसला. डेलीमेलच्या वृत्तानुसार, ब्राझीलच्या बारा डॉस कोकिरोस येथे काढण्यात आलेला हा व्हिडिओ अँड्राडेने लोकांना हसवण्यासाठी काढल्याचे म्हटले आहे.


कॉमेडियन अँड्राडे रस्त्यावर सुपरमॅनची नक्कल करत चालती वाहनं थांबवण्याचा प्रयत्न करत होता. सुपरमॅनचा लाल-निळा पोशाख घातल्याने आता आपल्या शरीरात पोलादाचं बळ आल्याचं चाहत्यांना सांगत होता. पाठीमागून येणारी बस आता केवळ हात लावून थांबवणार असल्याचे त्याने सांगितले होते. पण दुर्दैवानं तेवढ्यात त्या बसने त्याला पाठीमागून धडक दिली.

“बसमधील अंतराचा अंदाज चुकल्याने ही धडक बसली. देवाच्या हाताने मला या अपघात गंभीर जखमी होण्यापासून वाचवलं. त्या धडकेनंतरही काही झाले नाही,” असे अँड्राडेने एफ ५ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटल्याचे डेलीमेलने सांगितले.