उत्तर प्रदेशातील महोबा येथे जमावाने एका पोलिसाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतप्त जमावाने पोलीस अधिकाऱ्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. शिवाय व्हिडीओत पोलीस स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसत आहे. रस्त्यावर झालेल्या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर घडल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महोबा येथील रस्त्यावर झालेल्या अपघातात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पानवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आफतपुरा गावात वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच जमावाने हल्ला केला. यावेळी एका इन्स्पेक्टरला बेदम मारहाण करण्यात आली तर तीन पोलीस जीवाच्या भीतीने तेथून पळून गेले.

हेही पाहा- लिफ्टमधून कुत्र्याला नेणाऱ्या महिलेला माजी IAS ची मारहाण; नवऱ्याने घेतला बदला, घटनेचा VIDEO होतोय व्हायरल

१३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने लोक संतापले –

पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने जमलेले लोक पोलिसाला मारहाण करताना दिसत आहेत. सांगितलं जात आहे की, एका रोडवेज बसने सायकलवरून जात असलेल्या १३ वर्षीय मुलाला धडक दिली. या अपघातानंतर बस चालक बस घेऊन पळून गेला यावेळी सायकल बसमध्ये अडकली होती, तर ड्रायव्हर सुमारे ६ किमी लांब बस घेऊन गेला होता.

या घटनेनंतर लोकांनी मुलाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून रस्ता अडवला, ज्यामुळे मोठी वाहतूनक कोंडी झाली. त्यानंतर पानवाडी पोलीस ठाण्यात तैनात असलेले इन्स्पेक्टर राम अवतार आणि त्यांचे तीन पोलीस सहकारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले. यावेळी ते लोकांशी बोलत असताना अचानक काही लोकांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. इन्स्पेक्टर मारहाण करताच इतर पोलीस तेथून पळून गेले. या घटनेनंतर एसडीएम आणि सीओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे कोही लोकांवर गुन्हे दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, जमावाने इन्स्पेक्टरला ज्या प्रकारे मारहाण केली ते कृत्य अत्यंत भयानक असून इन्स्पेक्टरला वेळेवर वाचवले नसते तर त्यांचा जमावाने जीव घेतला असता असंही नेटकरी म्हणत आहेत.