मुंबईकरांचे लोकलशी खूप जवळचे नाते आहे. रेल्वेचा प्रवास हा फक्त प्रवास नसून, त्यापलीकडेही अनेक चांगले वाईट अनुभव हा प्रवास देत असतो. म्हणून एकाच डब्यात प्रवास करणारे हे अनोळखी चेहरे कधी घट्ट मित्रमैत्रिणी होतात हे कळतही. तर असा हा लोकलचा प्रवास मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यातून आजचा दिवस तर सगळ्यात खास आहे कारण पश्चिम रेल्वेवरील महिला विशेष लोकलला आज २५ वर्षे पूर्ण झाली. फक्त आणि फक्त महिला प्रवाशांसाठी धावणारी ही जगातील पहिलीच लोकल असेल. ५ मे १९९२ मध्ये ही लोकल सुरू करण्यात आली होती. त्यावेळी चर्चगेट ते बोरिवली अशी पहिली लोकल धावली होती.

मुंबई आणि उपनगरात प्रवास करणाऱ्या सगळ्याच महिलांचे एक घट्ट नातं ‘लेडिज स्पेशल’शी जोडलं आहे. फक्त प्रवासाच नाही तर अनेक गोष्टी गेल्या पंचवीस वर्षांत या लेडीज स्पेशल ट्रेनने महिलांना दिल्या. मग ती सुरक्षा असो की सुरक्षित प्रवास करण्याची भावना असो. शेजारी बसलेल्या अनोळखी महिला प्रवाशासोबत घट्ट मैत्रीचं नात तयार होणं, एकमेकींसोबत ट्रेनच्या छोट्याशा डब्ब्यात सण साजरे करणे असो किंवा आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी वाटण्यातला आनंद असो अशा गोष्टींच्या माध्यमातून या लेडीज स्पेशलने सगळ्याच महिलांचा प्रवास सुखकारक केला. अर्थात वाढत्या गर्दीचा त्रास अनेकींना होतो. पण तरीही या प्रवासाशी आणि लेडीज स्पेशलशी जोडलेली इमोशल अॅटॅचमेंट जगाच्या पाठीवर क्वचितच कुठे पाहायला मिळेल.

पश्चिम रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लेडीज स्पेशल ट्रेनचा २५ वर्षांपूर्वी काढलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. पश्मिच रेल्वे मार्गावर वाढती गर्दी पाहता महिलांसाठी ही विशेष लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. सुरूवातीला चर्चगेट बोरिवलीपर्यंत धावणारी ही विशेष लोकल १९९३ पासून विरारपर्यंत धावू लागली. आता अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर ही लोकल धावते.