Abhideep Saha Dies At 27: ‘अँग्री रँटमॅन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या YouTuber अभिदीप साहाचे बुधवारी २७ व्या वर्षी निधन झाले आहे. फुटबॉल, क्रिकेट आणि इतर खेळांवरील त्याच्या अनोख्या समालोचन शैलीसाठी तो ऑनलाईन व्हायरल झाला होता. आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे, बंगळुरूच्या नारायणा कार्डियाक हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर ओपन हार्ट सर्जरी सुद्धा झाली पण त्यानंतर त्याचे अनेक अवयव एकाच वेळी निकामी झाले होते. त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर सुद्धा ठेवण्यात आले होते पण अखेरीस बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली. अभिदीपचे युट्युबवर तब्बल ५ लाख सबस्क्राइबर होते.

साहाच्या सोशल मीडिया हँडलवरून या दुःखद घटनेची माहिती देण्यात आली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, “बुधवारी १० वाजून १८ मिनिटांनी वाजता अभिदीप साहा उर्फ ​​#AngryRantman याचे दुःखद आणि अकाली निधन झाले. त्याने आपल्या प्रामाणिकपणाने, विनोदाने लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणला होता नक्कीच त्याची आम्हाला खूप आठवण येईल. त्याच्या आनंदी आठवणींना आम्ही मनात साठवून ठेवू व या दुःखात त्याच्या कुटुंबियांना आम्ही आधार देऊ.”

अभिदीप साहा हा चेल्सीचा कट्टर चाहता होता. २०१७ मध्ये प्रीमियर लीग क्लबवर त्याने ‘नो पॅशन, नो व्हिजन’ म्हणत केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. फुटबॉल क्लबसाठी म्हटलेलं हे वाक्य नंतर ट्रेंडिंग मीम झाले होते. त्याचा आवाज, आवेश आणि भावना लोकांना आवडल्या होत्या. त्यानंतर त्याने अनेक खेळांच्या समालोचनाचे मजेशीर व्हिडीओ बनवले होते. साहाच्या निधनानंतर आता अनेक फुटबॉल क्लब्सनी पोस्ट करून श्रद्धांजली वाहिली आहे.

यापूर्वी रविवारी (१४ एप्रिलला), साहाचे वडील सौम्यदीप यांनी त्याच्या आरोग्यबाबत अपडेट दिला होता त्यावेळेस साहाला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.