स्टॉकहोममधील सेंटर फॉर पॅलोजेनिटीक्सच्या संशोधकांना ४० हजार वर्षांपूर्वीचा सिंहाचा छावा सापडला आहे. बर्फाखाली या सिंहाचा छावा सापडला असून आइस इज म्हणजेच हिम काळामध्ये बर्फाखाली गाडला गेल्याने आतापर्यंत सापडलेल्या सर्वात योग्य आणि सुस्थितीमधील प्राण्यांपैकी हा एक असल्याचं सांगण्यात येत आहे.

लाइव्हसायन्सने दिलेल्या वृत्तानुसार मोठ्या हत्तींचे दात गोळा करण्याच्या उद्देशाने सायबेरियामधील याकुताई या बर्फाळ प्रदेशात भटकंती करणाऱ्यांना हा छावा सापडला. या छाव्याचा शोध २०१७ साली लागल्याची माहिती समोर आली आहे. ही एक मादी असून तिचं नाव स्पार्टा ठेवण्यात आलं आहे. स्पार्टा जिथे सापडली तिथूनच काही अंतरावर म्हणजेच ५० फूटांवर २०१८ साली आणखीन एक सिंहाचा छावा आढळून आला ज्याला बोरीस असं नाव देण्यात आलं.

काय माहिती समोर आलीय?

या सिंहाच्या छाव्यावर मागील चार वर्षांपासून संशोधन सुरु होतं. त्याचा अहवाल ४ ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या ‘क्वाटरनरी’ नावाच्या जर्नलमध्ये छापण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये नामशेष झालेल्या सिंहाच्या प्रजातीच्या शारीरिक जडघडणीचा पहिल्यांचा वैज्ञानिकांना एवढा सखोल अभ्यास करता आल्याचं म्हटलं आहे. सध्याच्या आफ्रिकन सिंहाचे जवळचे वंशज असणाऱ्या केव्ह लायन्स म्हणजेच गुहांमध्ये राहणाऱ्या सिंहाच्या नामषेश झालेल्या प्रजातीमधील हा छावा आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये या सिंहांचं वास्तव्य होतं. २१ लाख वर्षांपासून ते ११ हजार ६०० वर्षांदरम्यान आलेल्या हिम कालखंडामध्ये हे सिंह नामशेष झाल्याचं सांगण्यात येतं. हे सिंह कठीण परिस्थितीमध्ये तग धरुन राहणाऱ्या प्राण्यांपैकी असल्याचं मानलं जातं.

कसं संशोधन केलं?

बोरिस आणि स्पार्टा या दोघांचाही अगदी लहान वयामध्ये तापमान कमी झाल्याने ओढावलेल्या नैसर्गिक संकटामुळे मृत्यू झाला. रेडिओकार्बो डेटिंग, एक्स रे इमेजिंग आणि पार्शियल डीएनए सिक्वेन्सिंगने हे छावे अवघ्या एक ते दोन महिन्यांचे असताना त्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. त्यांना नुकतेच दात येऊ लागले होते, असंही अहवालात म्हटलं आहे.

दोघांच्या मृत्यूमधील अंतर १४ हजार वर्षांचं…

विशेष म्हणजे काही फुटांच्या अंतरावर हे दोन्ही छावे सापडले असले तरी त्यांच्या मृत्यूच्या कालवधीमध्ये मोठा फरक आहे. स्पार्टाचा मृत्यू २८ हजार वर्षांपूर्वी तर बोरिसचा मृत्यू ४३ हजार वर्षांपूर्वी झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय.

(फोटो : क्वाटरनरी जर्नलमधून साभार)

गुहा कोसळल्याने झाला मृत्यू

दोन छाव्यांमधील मरणाचा कालावधी लक्षात घेता वैज्ञानिकांनी ही गुहा सिंहांसाठी उत्तम निवारा होती मात्र येथे नैसर्गिक संकटांची भीती अधिक होती असा अंदाज व्यक्त केलाय. विशेष म्हणजे या सिंहाचा मृत्यू गुहा कोसळल्याने झाल्याचीही शक्यताही व्यक्त करण्यात आलीय. या छाव्यांच्या कवट्या, बरगड्या आणि इतर हाडं तुटलेल्या अवस्थेत असल्याने ही शंका व्यक्त केली जात आहे. या सिंहांवर संशोधन सुरु असलं तरी त्यांची जीवनशैली काय होती, ते कसे राहत होते, अशा तापमानामध्ये ते कसे टिकून राहिले यासारख्या प्रश्नांची उत्तर अजून मिळालेली नाहीत.