चहा हा आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कित्येकांच्या दिवसाची सुरुवातच चहाने होते. पण सकाळचा चहा तुम्हाला कोणी किशोर कुमारांचं गाणं ऐकवत दिला तर ‘सोने पे सुहागा’ होईल ना? कोलकत्त्यामधील ५६ वर्षीय चहावाले किशोर कुमारांचं गाणं गात चहा देतात. त्यांच्या या हटके स्टाईलमुळे ते सोशल मीडियावर सध्या ते प्रसिद्ध होत आहेत. कोलकत्त्यामधील किशोर कुमारांची मधुर गाणी गाऊन चहा विकतानाचा चहावाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चहावाल्याचं नाव पलटन नाग असं आहे. त्यांचं कोलकत्त्यात स्वतःच चहाचं दुकान आहे. किशोर कुमारांची गाणी गात चहा विकणारा चहावाला म्हणून ते ओळखले जातात. या व्हिडीओमध्ये पलटन नाग १९७३ साली ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘नमक हराम’ या चित्रपटातील किशोर कुमारांनी गायलेलं ‘मैं शायर बदनाम’ हे गाणं गाताना दिसत आहेत.
“मी दहा वर्षांचा असल्यापासून किशोर कुमारांचं अनुकरण करतोय. मी त्यांना आदर्श मानतो. त्यांच्या गाण्यांचा मी कराओके (karaoke) वर सराव करायचो.”, असं नाग यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. नाग यांना लहानपासूनच गायक व्हायचं होतं. परंतु त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर घरातली आर्थिक परिस्थिती खालावली आणि त्यामुळे त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. माहितीनुसार, ७० च्या दशकात पलटण नाग हे सांस्कृतिक कार्यक्रमात गायचे आणि नंतर त्यांना बऱ्याच कार्यक्रमात गायची संधी देखील मिळाली होती.
#WATCH | West Bengal: A tea shop owner in Kolkata goes viral for entertaining customers by singing Kishore Kumar’s songs.
“I have followed Kishore Kumar since I was 10 years old. I practiced his songs on Karaoke. He is my idol,” says Paltan Nag, tea shop owner in Kolkata. pic.twitter.com/ng8CRZi8lU— ANI (@ANI) August 8, 2021
टाइम्स नाऊ ला दिलेल्या माहितीनुसार पलटण नाग यांच्याकडे किशोर कुमार यांच्या जवळपास ३५० गाण्यांचे कराओके(karaoke) ट्रॅक आहेत. मायक्रोफोनवरून ते किशोर कुमारांची हीच गाणी गात असतात. पलटण नाग यांची ही स्टाईल नेटकऱ्यांच्या मात्र चांगलीच पसंतीस उतरली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या हटके स्टाईलचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. किशोर कुमार हे गायक, संगीतकार, गीतकार, अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक होते. त्यांच्या गाण्यांचे देशभरातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहेत.