सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ सुंदर आणि मनमोहक व्हिडीओ असतात तर काही अतिशय भयानक असे शिकारीचेही व्हिडीओ असतात. प्राण्यांच्या शिकारीचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. अनेक नेटकऱ्यांनाही शिकारीचे थरारक व्हिडीओ पाहायला आवडतात. शिवाय अशा व्हिडीओमध्ये कोणता प्राणी कधी कोणावर हल्ला करेल आणि जीव वाचवण्यासाठी कोण शरणागती पत्करेल हे सांगणं कठीण असतं. कारण प्रत्येक व्हिडीओमध्ये काहीतरी वेगळा थरार पाहायला मिळतो. अनेक व्हिडीओमध्ये तर व्हिडीओच्या सुरुवातीला आपण लावलेला अंदाज शेवटच्या क्षणी खोटा ठरतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पूर्ण पाहिल्याशिवाय यातील तरसांता कळप विजयी झाला की सिंह हे कळत नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक सिंह तरसांच्या कळपात शिरल्याचं दिसत आहे. खरं तर सिंह असा प्राणी आहे, ज्याच्याशी भिडण्याची हिंमत कोणताच प्राणी सहसा करत नाही. म्हणून तर त्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. त्याच्या ताकदीची क्षमता प्राण्यांना चांगलीच माहिती आहे. पण ज्यावेळी तोच सिंह आपल्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला करत असेल तर त्याला देखील हरविण्याची ताकद व्हिडीओतील तरसांमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय एकत्र मिळून लढायचं म्हटलं तर विजय कसा मिळवला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका सिंहाने तरसांच्या कळपात शिरुन एका तरसाला आपल्या जबड्यात पकडल्याचं दिसत आहे. व्हिडीओत सुरुवातीला इतर तरस भीतीने पळून जाताना दिसत आहेत. मात्र, सिंहाने पकडलेला तरस जिवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात करताच ते तरस आपल्या सहकाऱ्याच्या मदतीसाठी धावून येतात आणि सिंहावर हल्ला करतात. सुरुवातीला सिंह त्यांना जुमानत नाही, पण न घाबरता तरस अंगावर धावून जाताच सिंह पकडलेल्या तरसाला सोडून देतो आणि तिथून निघून गेल्याचं दिसत आहे. शिवाय जखमी तरस आणि इतर त्याचे सहकारीही तेथून निघून जाताना दिसत आहेत. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण तो एकीचे बळ दर्शविणारा असल्याचं म्हणत आहेत.