Draupadi Pratha : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी दोन व्यक्ती एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरुवात करतात. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे येथे राज्य, धर्म किंवा समुदाय किंवा समाजानुसार वेगवेगळ्या लग्नाच्या परंपरा दिसून येतात. नुकतेच एका आगळ्या वेगळ्या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हिमाचल प्रदेशातील एका जुन्या हट्टी समाजाच्या बहुपत्नी परंपरेनुसार दोघा भावांनी एकाच महिलेशी लग्न केले आहे. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात हे लग्न पार पडले, जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले आहे.
दी ट्रिब्यून वृत्तानुसार, सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावातील प्रदीप नेगी व कपिल नेगी या दोन भावांनी कुन्हट गावातील सुनीता चव्हाण या महिलेशी लग्न केले आहे. हट्टी या समाजात ‘द्रौपदी प्रथेनुसार’ विवाह पार पडतो, ज्यामध्ये महिला नवऱ्याच्या भावांसह लग्न करते. त्यांची ही एक जुनी परंपरा आहे
जाणून घ्या या परंपरेविषयी…
ही परंपरा ‘द्रौपदी प्रथा’ म्हणून ओळखली जते. सिरमौर जिल्ह्यातील डोंगर भाग परिसरात (Trans-Giri area) आणि उत्तराखंडच्या इतर भागांमध्य ही प्रथा कुटुंबात एकता टिकवून ठेवण्यासाठी, वडिलोपार्जित जमिनीची वाटणी होऊ नये आणि कोणतीही महिला विधवा राहू नये या कारणांसाठी अस्तित्वात आली, जी अजूनही लोक पाळतात. आधुनिक परंपरेचा प्रभाव वाढल्याने या प्रथेचा पसार आता कमी होत आहे.
नवरदेव आणि नवरी काय म्हणतात?
या प्रथेनुसार नुकतेच प्रदीप नेगी व कपिल नेगी या दोन्ही भावांनी सुनीता चव्हाण हिच्याशी लग्न केले. प्रदीप हा जलशक्ती विभागात काम करतो आणि कपिल परदेशात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करतो. एकमेकांपासून दूर राहूनही दोन्ही भावांनी सुनीताबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसेच, लग्नाच्या सर्व विधींमध्येही ते समान रीतीने सहभागी झाले होते.
या अनोख्या प्रथेविषयी प्रदीप सांगतो, “हा आम्ही तिघांनी मिळून घेतलेला परस्पर निर्णय होता. त्यामध्ये विश्वास, काळजी व सामाजिक जबाबदारी याचा अंतर्भाव आहे. आम्ही आमची प्रथा उघडपणे जगासमोर आणली. कारण- आम्हाला आमच्या इतिहासाविषयी अभिमान आहे.” तर, कपिल सांगतो, “आम्ही नेहमीच पारदर्शकतेवर विश्वास ठेवला आहे. मी परदेशात राहतो; पण या लग्नामुळे सुनीताला एकत्रित कुटुंब म्हणून आधार, सुरक्षा व प्रेम मिळेल.”
सुनीता या लग्नाविषयी सांगते, “ही माझी निवड होती. माझ्यावर कोणीही कधीही दबाव टाकला नाही. मला या परंपरेची पूर्ण जाणीव आहे आणि मी माझ्या इच्छेने या प्रथेची निवड केली आहे. आम्ही एकमेकांना एकत्र राहण्याचे वचन दिले आहे आणि आम्हाला आमच्या या नात्यावर विश्वास आहे”
प्रदीप, कपिल व सुनीताचा हा तीन दिवसीय विवाह सोहळा होता. या लग्न समारंभात गावकरी, नातेवाईक आणि जवळचे लोक उपस्थित होते. ही दुर्मीळ विवाह प्रथा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.