रशिया युक्रेन युद्धाचा आज २० वा दिवस आहे. युद्ध संपेल अशी कोणतीच शक्यता दिसल्याने याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. या युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. रशियात देखील नागरिकांचा उद्रेक होत असल्याचं चित्र आहे. रशियन न्यूज चॅनेल असलेल्या चॅनेल वनच्या एका शोमध्ये प्रोड्युसरने ‘No War’ असं लिहिलेला फलक घेऊन गेली आणि चालू शो दरम्यान झळकावला. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना १४ मार्चच्या संध्याकाळची आहे असं सांगण्यात येत आहे.

द गार्डियनमधील वृत्तानुसार चॅनल वनच्या प्रोड्युसर मरीना ओव्हस्यानिकोवा १४ मार्च रोजी चॅनलच्या लाइव्ह शोमध्ये पोहोचल्या आणि युद्ध संपवा असे ओरडू लागली. व्हिडिओमध्ये ओव्हस्यानिकोवा अँकरच्या मागे फलक झलकावत ओरडताना दिसत आहे. असं असताना अँकरने तिच्या बातम्या वाचणे सुरू ठेवले. “युद्ध नको, युद्ध थांबवा, प्रचारावर विश्वास ठेवू नका, ते तुमच्याशी खोटे बोलत आहेत”, असं ती ओरडत होती. मरीना ओव्हस्यानिकोवा म्हणून ओळखल्या जाणार्‍या महिलेला नंतर अटक करण्यात आली असून सध्या पोलीस कोठडीत आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी तिचे आभार मानले आणि सांगितले की, ‘मी सर्व रशियन लोकांचे आभारी आहे.” व्हिडीओ स्टेटमेंटमध्ये, अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, “मी त्या रशियन लोकांचा आभारी आहे जे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. वैयक्तिकरित्या त्या महिलेचा जिने युद्धाच्या विरोधात पोस्टर घेऊन चॅनल वनच्या स्टुडिओमध्ये प्रवेश केला. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार २४ फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने शेजारील युक्रेनवर हल्ला केला. पुतिन याला लष्करी कारवाई म्हणत आहेत. मानवाधिकार गटाचा असा विश्वास आहे की रशियाच्या हल्ल्यात शेकडो युक्रेनियन मरण पावले आहेत आणि लाखो लोकांना शेजारच्या देशांमध्ये निर्वासित होण्यास भाग पाडले गेले आहे.