AB de Villiers on Anushka Sharma’s Pregnancy : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामने खेळणार की नाही? यावरून चर्चा रंगत आहेत. कारण संघात त्याची निवड झाल्यानंतरच त्याने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले, ज्यानंतर विराट कोहलीने अचानक कसोटी मालिकेतून विश्रांती का घेतली, तो कुठे आहे, यावर अनेक चर्चा रंगू लागल्या. याचदरम्यान विराट कोहलीचा जिवलग मित्र एबी डिव्हिलियर्सने आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची बातमी जाहीर करत सर्वांना आश्चर्यचकित केले. विराट सध्या कुटुंबाबरोबर आपला वेळ घालवत असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. पण, या विधानानंतर एबी डिव्हिलियर्सने आता कोहलीच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी उघड करणे ही त्याची सर्वात मोठी चूक असल्याचे म्हणत माफी मागितली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स हा विराट कोहलीचा जिवलग मित्र आहे. आयपीएलदरम्यान हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र झाले, त्यामुळे एबी डिव्हिलियर्सनने विराट कोहलीबाबत दिलेली माहिती खरी असल्याचे मानले जाते. यानंतर ही बातमी मीडिया आणि सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली. यानंतर प्रत्येक जण विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा होण्याची वाट पाहत आहे.
यानंतर एबी डिव्हिलियर्सने आता त्याच्याकडून मोठी चूक झाली असून त्याने विराटबद्दल दिलेली माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या S20 लीगदरम्यान डिव्हिलियर्सने विराट कोहलीच्या ब्रेकविषयी दैनिक भास्करला सांगितले की, क्रिकेट नंतर येते आणि कुटुंब आधी येते. माझ्याकडून मोठी चूक झाली, मी विराटबद्दल दिलेली माहिती चुकीची होती. विराट कोहलीला देशासाठी खेळताना विश्रांती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. काही कौटुंबिक कारणामुळे विराट कोहली बाहेर आहे. यावेळी तो कुठे आहे कोणालाच माहीत नाही. पण, विराट कोहलीच्या जगभरातील सर्व चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. विराट कोहलीने विश्रांती घेण्याचे कारण काहीही असो, मला आशा आहे की तो आणखी मजबूतपणे मैदानात परतेल.
विराटने ब्रेक घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याची आई आजारी असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या, त्यामुळेच त्याने ब्रेक घेतला असे बोलले जाऊ लागले. मात्र, यानंतर विराटचा भाऊ विकास कोहलीने सोशल मीडियावर हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होऊ शकते. उरलेल्या कसोटी सामन्यांमध्ये कोहली खेळेल अशी अपेक्षा होती. मात्र, विराट संपूर्ण मालिका खेळू शकणार नसल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. यात कितपत तथ्य आहे हे येणाऱ्या काळात कळेलच.