Indian Railway Viral Video: लखनऊ-बरौनी एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी गुरुवारची रात्र एखाद्या सिनेमासारखी ठरली. रात्रीच्या प्रवासात A2 एसी कोचमध्ये बसलेले प्रवासी हैराण – “एसीतून थंड हवा का येत नाही?” पंख्याच्या उष्ण वाऱ्याने त्रस्त होऊन काही प्रवाशांनी तक्रार नोंदवली. ट्रेन लखनऊ जंक्शनला पोहोचताच रेल्वेचे तंत्रज्ञ कोच तपासायला आले. पण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी – सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
लखनऊ-बरौनी एक्स्प्रेसमधील एसी कोचमधील प्रवाशांची अवस्था कातर झाली होती. थंड हवा बंद असल्याने सगळे घामाने निथळत होते. काहींनी तक्रार नोंदवली आणि ट्रेन लखनऊ जंक्शनवर पोहोचताच तांत्रिक तपासणी सुरू झाली. टेक्निशियनने एसी डक्ट उघडला आणि अचानक एक वेगळीच गंध लाटेसारखी पसरली. प्रवाशांचे चेहरे गोंधळले, अधिकारी चकित झाले आणि जिज्ञासेने सगळे डोळे त्या डक्टकडे खिळले… आत जे दिसलं, त्याने संपूर्ण कोचचं वातावरणच बदलून टाकलं
तंत्रज्ञाने एसी डक्ट उघडताच, थंड वाऱ्याऐवजी कोचमध्ये पसरला तो दारूचा जबरदस्त वास. लोकांना सुरुवातीला वाटलं, कुणाचीतरी बॅग फाटली असावी, पण जेव्हा आत डोकावलं तेव्हा दिसले – पॅकेटवर पॅकेट आणि पॅकेट उघडताच समोर आला मिनी दारूच्या बाटल्यांचा ‘फुल्ल बार स्टॉक.’
AC डक्टमध्ये ५७ लिटर दारू
जेव्हा GRP ला बोलावण्यात आलं, तेव्हा मोजणी सुरू झाली. एसी डक्टमधून बाहेर काढल्या गेल्या तब्बल ३१६ मिनी बाटल्या – त्यात २५६ ‘ऑफिसर चॉईस’ आणि ६० ‘आफ्टर डार्क ब्लू’ ब्रँडच्या, प्रत्येकी १८० मि.ली. क्षमतेच्या म्हणजेच जवळपास ५७ लिटर दारू. तपासात उघड झालं की हा माल थेट बिहारला जात होता, जिथे २०१६ पासून पूर्ण दारूबंदी आहे.
कोच अटेंडंटचा कबुलीजबाब
GRPने घटनास्थळीच कोच अटेंडंट आशीष कुमारला अटक केली. चौकशीत त्याने मान्य केलं की तो बऱ्याच काळापासून यूपीहून बिहारपर्यंत दारू पोहोचवत होता. एसी डक्ट हा त्याचा ‘सुरक्षित गुप्त मार्ग’ होता. गंतव्य स्टेशनवर पोहोचल्यावर तो हा माल ठराविक व्यक्तीकडे सोपवत असे. आता पोलिस या संपूर्ण तस्करी नेटवर्कचा शोध घेत आहेत.
तस्करांची क्रिएटिव्हिटी थक्क करणारी
बिहारमध्ये दारूबंदीनंतर तस्करांनी अनेक ‘जुगाड’ शोधले – दुधाच्या ड्रममध्ये, ट्रकच्या गुप्त कपाटात… पण, आता तर रेल्वेच्या एसी डक्टलाही ‘स्मगलिंग रूट’ बनवलं गेलं. रेल्वे अधिकारी हसत म्हणाले – “एसी चालू राहिला असता तर कदाचित बारही चालू राहिला असता!”
सोशल मीडियावर ‘बोतल एक्स्प्रेस’ची चर्चा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी भन्नाट कमेंट्स केल्या. कुणी लिहिलं, “तिकिटात ड्रिंक फ्री होतं का?”, तर कुणी जोक केला, “AC बंद, बार चालू – IRCTC चा नवा मॉडेल!” आणखी एकाने कमेंट टाकली – “बिहारमध्ये तस्करीची क्रिएटिव्हिटी लेव्हल एकदम टॉप.”
येथे पाहा व्हिडीओ
रेल्वे प्रशासनाला आता या ‘बोतल एक्स्प्रेस’चा माग काढावा लागणार आहे. पण, प्रवाशांच्या मनात अजून एकच प्रश्न – पुढच्या वेळी एसी डक्ट उघडल्यावर थंड हवा मिळेल की… आणखी एखादं ‘सरप्राइज’?