हैदराबादमधील एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या फिश बिर्याणीत झुरळ आढळल्याच्या घटनेनंतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या चिकन बिर्याणीमध्ये पाल आढळून आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा ऑनलाइन खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत.
हैदराबाद शहरातील आरटीसी क्रॉस रोडवर असलेल्या ‘बावर्ची बिर्याणी’मधून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या चिकन बिर्याणीत ही मृत पाल आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात खूपच खळबळ उडाली आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या घटनेनंतर संबंधित ग्राहकाने आपल्या कुटुंबासह शॉपच्या गेटसमोर जाऊन घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी बिर्याणीत पाल आढळल्याची माहिती मिळताच लोकांनी संबंधित रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. त्यामुळे रेस्टॉरंटच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बिर्याणीने भरलेल्या प्लेटमध्ये एक मृत पाल दिसत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
यापूर्वी ऑनलाइन ऑर्डर केलेल्या हैदराबादी बिर्याणीच्या प्लेटमध्ये मृत झुरळ आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. शहरातील कोटी परिसरात ऑनलाइन ऑर्डर केलेल्या फिश बिर्याणीत झुरळ आढळले होते. त्यानंतर ग्राहकाने Reddit वर या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला होता.