Dharamshala Paragliding Accident Video Viral: धर्मशाळा येथील निसर्गरम्य टेकड्यांमध्ये थोडा थरार अनुभवायचा होता, पण तो अनुभव शेवटचा क्षण ठरेल असं कुणालाही वाटलं नसेल. पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा जीवघेणा अपघात… आणि त्याचा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या धक्कादायक व्हिडीओने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. साहसाच्या नावाखाली सुरू असलेला हा खेळ आता थेट ‘जिवाशी खेळ’ ठरत आहे का? या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. साहसी खेळ म्हणजे थरार… की मृत्यूचा साक्षात्कार?
धर्मशाळामध्ये थराराचा अनुभव घ्यायला आलेल्या २५ वर्षीय तरुणाचा पॅराग्लायडिंगदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गुजरातमधील अहमदाबादचा रहिवासी सतीश, आपल्या चुलत भावासोबत सुट्टी घालवण्यासाठी हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे गेला होता. मात्र, रविवारी संध्याकाळी बांगोटू टेकडीवरून (इंद्रुनाग पॅराग्लायडिंग झोनच्या वर) टेक-ऑफ करताना त्याचा जीवघेणा अपघात झाला.
हा भीषण प्रसंग संपूर्णपणे कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “हा साहसी खेळ नसून थेट ‘अखेरचा प्रवास’ वाटतोय!” अशी टीका अनेकांनी केली आहे.
अपघातादरम्यान सतीश आणि त्याच्यासोबतचा पायलट गंभीर जखमी झाले. पायलटचा जीव वाचला असला तरी सतीशने संध्याकाळपर्यंत उपचारादरम्यान प्राण गमावले. त्याला प्रथम धर्मशाळा येथील झोनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि नंतर टांडा येथील डॉ. राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
विशेष म्हणजे, या वर्षातील धर्मशाळामधील हा दुसरा जीवघेणा पॅराग्लायडिंग अपघात ठरला आहे. जानेवारी महिन्यात १९ वर्षीय महिला पर्यटकाचा असाच टेक-ऑफदरम्यान मृत्यू झाला होता. त्याच महिन्यात कुल्लूच्या गडसा भागातदेखील एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता.
नेटकऱ्यांनी या घटनेनंतर साहसी क्रीडा प्रकारांवरील प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. “जर पॅराग्लायडिंगवर सप्टेंबरपर्यंत बंदी घातली गेली आहे, तर एवढे मोठे ग्लायडर हवेत उडताना प्रशासन काय बघत होतं?” असा संतप्त सवाल एका युजरने केला.
सावधान! थराराच्या नादात जीव धोक्यात येतोय… येथे पाहा व्हिडीओ
या अपघातामुळे पुन्हा एकदा भारतातील अॅडव्हेंचर स्पोर्ट्सवरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चुकीच्या व्यवस्थापनामुळे निष्पाप जीव गेल्याच्या घटनांमुळे आता लोक विचार करत आहेत. साहस म्हणजे आनंद की मृत्यूचा साक्षात्कार?