महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देत थेट सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांपैकी ३० आमदार अजित पवारांसह राजभवनात हजर होते. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि इतर ९ आमदारही मंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या राजकीय बंडखोरीमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. अनेक विरोधकांनी अजित पवारांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान या राजकीय भूकंपानंतर आता सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत आहे, तर काही मिम्स विचार करायला भाग पाडणारी आहेत तर काही तुम्हाला खळखळून हसवणारी आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेताच ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडिया माध्यमांवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.