Pakistani Cricketer Post on Vaisho Devi Reasi Attack: रविवारी न्यूयॉर्कमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टी २० विश्वचषक २०२४ मधील क्रिकेट सामना सुरू असताना, जम्मू काश्मीर येथील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४१ जण जखमी झाले होते. शिव खोरी मंदिरातून कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हा हल्ला झाला. हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्याचे चित्र जम्मू-काश्मीर पोलिसांनी शेअर केले असून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला २० लाखांचे बक्षीस देण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे दहशतवाद्याचे चित्र तयार करण्यात आल्याचे सांगून पोलिसांनी नागरिकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान रियासी येथे झालेल्या या भ्याड हल्ल्यावरून पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अलीने शेअर केलेली स्टोरी सध्या चर्चेत आली आहे.

हसन अलीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रियासी येथील हल्ल्याच्या निषेधार्थ पोस्टर शेअर केले. यामध्ये त्याने “ऑल आईज ऑन वैष्णोदेवी” असे लिहिले आहे. रफाहवरील इस्रायली हल्ल्याबद्दल विरोध व संताप व्यक्त करताना सोशल मीडियावर ‘ऑल आइज ऑन Rafah’ या पोस्ट ट्रेंड झाल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी विविध मुद्द्यांवर विरोध दर्शवण्यासाठी ‘ऑल आयज ऑन…’ च्या अनेक आवृत्त्या ट्रेंड केल्या. मागील पाच दिवसात भारतात सुद्धा सामान्य नागरिकांकडून “ऑल आईज ऑन वैष्णोदेवी” या पोस्ट शेअर केल्या जात आहेत पण ज्या सेलिब्रिटीजनी पुढाकार घेऊन रफाहावरील हल्ल्याचा विरोध केला होता त्यांनी अद्याप रियासी हल्ल्यावर भाष्य केलेले नाही. यावरून सुद्धा ऑनलाईन चर्चा आहेत. अशातच पाकिस्तानी खेळाडूने या मुद्द्यावर पोस्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हसन अली इन्स्टाग्राम स्टोरी

हसन अलीने भारतीय तरुणी सामिया हिच्याशी लग्न केले आहे. सामियाने सुद्धा “ऑल आईज ऑन वैष्णोदेवी” हे पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

हसन अलीने X वर दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारी पोस्ट का शेअर केली याचेही स्पष्टीकरण दिले आहे. अली लिहितो की, “दहशतवाद/हिंसा ही एक गंभीर समस्या आहे मग ती कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध असो. म्हणून मी हे शेअर केले आहे. मी जिथे जमेल तिथे शांततेचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतो. गाझामधील हल्ल्यांचा मी नेहमीच निषेध केला आहे आणि अजूनही निष्पाप जीवांवर हल्ले होत आहेत. प्रत्येक मानवी जीवन महत्त्वाचे आहे. अल्लाह ग्वादरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो. आमिन ??”

हे ही वाचा << जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणाऱ्या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाच्या सोशल मीडिया पोस्टचे इंटरनेटवर कौतुक झाले आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी “हसन अलीबाबत आदर वाटतो” या कॅप्शनसह स्टोरी पोस्ट केली. तर काही पाकिस्तानी अकाउंटवरून हसन अलीच्या पोस्टवर संताप व्यक्त केला जात आहे.