अनेकदा आपल्या ध्यानीमनीही नसतं पण आपल्याला अनपेक्षित लाभ होतो. त्यातूनही एक सुखद धक्काच बसतो. असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला. अमेरिकेतील मिशिगनमध्ये एका लॉटरी विकणाऱ्या व्यक्तीनं चुकीनं त्या व्यक्तीला दुसरंच तिकिट दिलं आणि त्याचं लक म्हणाल तर त्याला चक्क २ दशलक्ष डॉलर्सची लॉटरीही लागली.

सीएनएननं दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीला ही लॉटरी लागली ती व्यक्ती आपल्या पत्नीच्या गाडीत हवा भरण्यासाठी गेली होती. “मी सुटे पैसे घेण्यासाठी स्टेशन क्लर्ककडे गेलो आणि मी त्यांकडून १० डॉलर्सची लॉटरीची ७ तिकिटं विकत घेतली. परंतु चुकून त्यांनी मला २० डॉलर्सवाली तिकिटं दिली. त्यानंतर त्यांनी ती बदलूही घेण्यास सांगितली. पण मी वरचे पैसे देऊन ती ठेवून घेतली आणि त्यातच मला लॉटरी लागली,” असं त्या व्यक्तीनं सांगितलं.

त्या व्यक्तीनं आपलं नाव सांगितलं नाही. परंतु या २ दशलक्ष डॉलर्सचं आपण काय करणार याची मात्र माहिती दिली. आपल्याला या पैशातून एक घर विकत घ्यायचं असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. एकदाच पैसै काढले तर त्या रकमेतून त्यांना केवळ १.३ दशलक्ष डॉलर्सची रक्कम मिळणार आहे.