Anaconda Shocking Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी ते दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना, तर कधी इतर प्राण्यांबरोबर लढताना दिसतात. त्यापैकी काही व्हिडीओ हे फारच भयानक, धडकी भरवणारे असतात. विशेषत: साप, अजगर हे शिकार करत असतानाचे व्हिडीओ पाहून तर अंगावर अक्षरश: काटा येतो. त्यात आता अॅनाकोंडाचा शिकार करतानाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला भीती वाटल्याशिवाय राहणार नाही.
अॅनाकोंडा हा जंगलातील सर्वांत धोकादायक आणि विशाल प्राणी आहे, त्याचे शरीर इतके लांबलचक आणि भारदस्त असते की, तो कोणत्याही क्षणाला मोठ्यातील मोठ्या प्राण्याची शिकार करू शकतो. या व्हिडीओतही एक महाकाय अॅनाकोंडा एका सापाची शिकार करताना दिसतोय. पण, शिकारीदरम्यान असे काही घडते की, ते पाहून तु्म्हालाही धक्का बसेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महाकाय अॅनाकोंडा नदीकाठी शिकार करून सुस्तावलेला दिसतोय. त्याचे शरीर इतके भरीव अन् फुगीर दिसतेय की ते पाहूनच समजते की, त्याने कोणत्या तरी प्राण्याची शिकार केली आहे. काही वेळात अॅनाकोंडा आपला जबडा उघडतो तेव्हा त्याच्या तोंडातून सापाचे डोके बाहेर येते. अॅनाकोंडाने शिकारीच्या उद्देशाने त्या सापाला गिळले असावे; पण ते भक्ष्य बहुधा त्याला पचवता न आल्याने त्याने तोंडावाटे त्या सापाला लगेच आपल्या शरीराबाहेर काढले.
ॲनाकोंडा अनेकदा भक्ष्याला गिळल्यानंतर त्याला तोंडावाटे बाहेर काढतात. या व्हिडीओतही हेच दृश्य पाहायला मिळाले. अॅनाकोंडाने एक जिवंत अख्खा साप गिळला होता; पण तो साप काही क्षणांत जिवंत अवस्थेतच त्याच्या तोंडातून बाहेरही आला. एक ॲनाकोंडा सापही खाऊ शकतो हे पाहूनच अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेय.
अॅनाकोंडाच्या शिकारीचा हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “तो लहान जीव अजूनही जिवंत आहे का” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटतं तो तिचा मुलगा असावा”. शेवटी एकाने लिहिले की, ती जन्म देत आहे का? की हा दुसरा अॅनाकोंडा आहे, जो तिला पचवता आला नाही?”