Tiger Protects Her Cub Video Viral : जगात आईसारखी माया, प्रेम दुसरं कोणी करू शकत नाही, त्यामुळेच म्हटलं जातं की शेवटी आई ती आईच असते. फक्त माणूसच नाही तर प्राणीदेखील आपल्या पिल्लांची जीवापाड काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात. सध्या एक वाघीण आणि तिच्या बछड्याचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात वाघिणीचे कृत्य पाहून तुम्हीही म्हणाल की, शेवटी आई ती आईच असते.
माणसांप्रमाणेच प्राण्यांना भीती असते की, कोणी आपल्या पिल्लांना त्रास देईल, त्यांना मारेल; त्यामुळे ते पिल्लांना अजिबात आपल्या डोळ्यांसमोरून दूर जाऊ देत नाहीत. अशाप्रकारे व्हिडीओत एक वाघीण तिच्या बछड्याला डोळ्यांसमोरून दूर जाऊ देत नसल्याचे दिसतेय.
वाघीण बछड्याच्या मागोमाग आली अन्…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, प्राणिसंग्रहालयातील एका मोठ्या पिंजऱ्यात असलेल्या छोट्या बंदिस्त खोलीत वाघीण आणि तिच्या बछड्याला ठेवण्यात आलं आहे, ज्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलीय. याचवेळी अचानक त्या बंदिस्त खोलीत नुकताच जन्मलेला वाघिणीचा बछडा हळूहळू रांगत बाहेर येतो. तो समोर उभ्या असलेल्या पर्यटकांच्या दिशेने जाऊ लागतो. पण, अचानक वाघिणही त्याच्या मागोमाग येते. तिच्या चेहऱ्यावर बछड्याविषयी काळजी आणि राग दिसून येतो. ती एक क्षणही वाया न घालवता बछड्याला तोंडाने उचलते आणि पुन्हा खोलीत घेऊन जाते. हे दृश्य इतकं भावनिक आहे की लोक पुन्हा पुन्हा तो व्हिडीओ पाहतायत, कारण पिलाची अशी काळजी फक्त एक आईच घेऊ शकते.
वाघीण आणि तिच्या बछड्याचा भावनिक व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही मनापासून कमेंट्स करतायत. एकाने लिहिले की, आईला माहीत आहे की माणसं किती धोकादायक असू शकतात. दुसऱ्याने म्हटले की, तिने बछड्याला कॅमेरा आणि गर्दीपासून वाचवले. कोणीतरी विनोदाने लिहिले की, आई विचार करत असेल, हे लोक माझ्या मुलाकडे असे का पाहत आहेत?
हा व्हिडीओ केवळ आईचे प्रेम दाखवत नाही तर प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या स्थितीबद्दलही प्रश्न उपस्थित करत आहे. या प्राण्यांना योग्य संरक्षण आणि स्वातंत्र्य मिळत आहे का? की ते फक्त मनोरंजनाचे साधन बनले आहेत? असा सवाल काहींनी उपस्थित केला. तर
काही जण म्हणतायत की, माणूसचं नाही तर प्राण्यांमध्येही आपल्या पिल्लांविषयी काळजी आणि प्रेम आहे, आई केवळ जन्म देत नाही तर प्रत्येक क्षणी मुलाला प्रत्येक धोक्यापासून वाचवण्यासाठी तयार असते… मग ते जंगलात असो किंवा प्राणिसंग्रहालयात.