जगातील कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्ती असू दे; विविध अन्नपदार्थांनी सगळे जोडले जात असतात. मग ते पदार्थ अगदी विदेशांतील भाज्या घालून बनवलेले सॅण्डविच असू दे किंवा भारतातील घराघरांत तयार होणारी पोळी-भाजी असू दे. प्रत्येक पदार्थाची चव, रूप आणि त्याची तयार करण्याची पद्धत ही पदार्थांना वेगवेगळे रूप देत असते. जगभरात प्रत्येक पदार्थांमध्ये विविध प्रकार असतात. भारतातील अगदी सोप्या पदार्थापासून म्हणजे रोजच्या जेवणातील पोळीचा विचार केला तरी त्यामध्ये घडीची पोळी, फुलका, चपाती, रोटी, पुरणपोळी असे नानाविध प्रकार असतात. तसेच परदेशातील ब्रेड्समध्येही सॅण्डविच ब्रेड, बेगेट्स [फ्रेंच पदार्थ], प्रेटझल्स [pretzels] असे विविध प्रकार आढळून येत असतात. असे हे सर्व प्रकारचे ब्रेड्स बनवण्याची पद्धत कमी-जास्त प्रमाणात सारखी असू शकते.

असाच एका ब्रेड तयार करण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून व्हायरल होताना दिसतो आहे. ‘आर्मेनियन लवाश ब्रेड’ असे त्या पदार्थाचे नाव आहे. @stepshots या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये तीन स्त्रिया एकत्र मिळून हा ब्रेड बनवीत असल्याचे दिसते आहे. त्यापैकी पहिली स्त्री हातामध्ये कणकेचे गोळे घेऊन एखादी रुमाली रोटी ज्या पद्धतीने हातावरच गोल गोल फिरवीत वाढवली जाते अगदी त्याप्रमाणेच या ब्रेडला आकार देत आहे. कणकेच्या गोळ्याला आकार दिल्यानंतर ती तो पातळ असा ब्रेड दुसऱ्या स्त्रीच्या हातामध्ये देते. आता दुसरी स्त्री तो ब्रेड एका लांब उशीवर ठेवून, छान ताणून त्याचा आकार अजून मोठा करते आणि शेवटी खोलीच्या मध्यभागी असणाऱ्या तंदूरमध्ये टाकते. तिसरी स्त्री लांब व टोकेरी अशा पातळ दांड्याने तंदूरमधील तो ब्रेड चांगला शेकून झाल्यानंतर काढून घेऊन, इतर ब्रेड्ससोबत ठेवताना दिसत आहे. हा आर्मेनियन लवाश ब्रेड अगदी आपल्या इथे मिळणाऱ्या तंदुरी रोटी किंवा तंदुरी नानसारखाच दिसतो.

हेही वाचा : कराचीमध्ये अंडी आणि कबाबपासून बनवली जाते ‘ही’ ७३ वर्ष जुनी रेसिपी; पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओला आतापर्यंत ३८.१ मिलियन इतके व्ह्युज मिळाले असून, सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर ताबडतोब नेटकऱ्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी ‘हा ब्रेड आर्मेनियन नसून, तुर्कीचा असल्याचे’ काहींचे म्हणणे आहे. नेटकऱ्यांच्या या व्हिडिओवर नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आर्मेनियन लवाश? लवाश हा तुर्की शब्द आहे आणि हा ब्रेडसुद्धा,” अशी माहिती एकाने दिली. “हा तुर्कीचा पदार्थ आहे. कदाचित तेथील लोक इथे राहिल्यानंतर हा पदार्थ शिकले असावेत.” अशी प्रतिक्रिया दुसऱ्याने दिली. तिसऱ्याचे, “तुर्कीचा पदार्थ चोरला आहे,” असे म्हणणे आहे. तर चौथ्याने, “ज्यांचे कुणाचे म्हणणे आहे की हा पदार्थ अझरबैजान किंवा तुर्कीचा आहे त्यांनी हे लक्षात घ्यावे की, हा ब्रेड जेव्हा तुर्की किंवा अझरबैजानमध्ये अस्तित्वातही नव्हता तेव्हापासून तो आर्मेनियात ओव्हनमध्ये बनवला जात होता,” अशी आपली बाजू मांडल्याचे दिसते. असा पदार्थ बघून अनेक भारतीयांनीही त्यावर कमेंट्स केल्या आहेत. त्या काही अशा “आणि आमच्या इथे याला तंदुरी रोटी किंवा तंदुरी नान म्हटले जाते” अशा स्वरूपाच्या असल्याचे पाहायला मिळते.