Ashadhi Ekadashi Wari Video: अनेक वारकरी, करोडो भक्त ज्या दिवसाची वाट पाहत असतात तो म्हणजे आषाढी एकादशी. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम मानलं जातं. या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’, असंदेखील म्हटलं जातं. आज पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
आषाढी एकादशीचा हा दिवस पंढरपूरमध्ये उत्साहाचा आणि भक्तिमय वातावरणाचा असतो. लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात. या दिवशी उपवास, भजन, कीर्तन आणि विठूनामाचा गजर सगळीकडे असतो.
आषाढी एकादशीची ही वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. वर्षानुवर्षे ही परंपरा वारकरी न चुकता पाळतात. उन, वारा, पाऊस कशाचीही चिंता न करता मनात फक्त प्रेम आणि भक्ती घेऊन हे वारकरी मैलोन मैल प्रवास करतात. या वारकऱ्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध दिव्यांग आजोबा अखंड मेहनत घेऊन वारीत सामील झालेले दिसतायत. हा व्हिडीओ वारीदरम्यानचा आहे जो आता व्हायरल होत आहे.
आषाढी एकादशी वारी व्हिडीओ (Ashadhi Ekadashi Pandharpur Wari Video)
वारीतील या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध दिव्यांग आजोबा खूप मेहनतीने या सोहळ्यात सामील झालेले दिसतायत. चालता येत नसल्याने आजोबांनी दोन कापडं सोबत घेतली आहे. त्यावर बसून ते हातावर जोर देऊन चालताना दिसतायत. एका कापडावर बसून झालं की दुसरं कापड ते पुढे ठेवतात आणि त्यावर बसतात. आयुष्यात कितीही संकटं आली तरी वारकऱ्यांबरोबर दिंडीत सामील होण्यासाठी आणि विठोबाच्या भक्तीसाठी आजोबांनी जिद्द न हारता केलेली मेहनत सध्या व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @aesthetic_punecity या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “यवत ते वरवंड दरम्यान पंढरपुरकडे निघालेल्या या माऊलींचा अविस्मरणीय क्षण” अशी कॅप्शन देण्यात आलेली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ६.८ मिलियन व्ह्युज आले आहेत.
आजोबांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, खूप सुंदर व्हिडीओ डोळे भरून आले. तर दुसऱ्याने “खूप आनंद आहे अशा वारीमध्ये पांडुरंगाच्या कृपेने एक वेळेस तरी वारीने पायी जावे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला “फक्त या माऊलींच्या पाया पडले तरी माझी वारी सार्थकी लागेल”, तर एकाने “साक्षात पांडुरंगाचे दर्शन झालं” अशी कमेंट केली.