Asia Cup 2025: रविवारी भारताने पाकिस्तानविरूद्ध आशिया कप २०२५ जिंकला. या रोमांचक सामन्यातील विजयानंतर भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. देशभरात भारतीयांनी विजयाचा आनंद साजरा केला. मात्र, दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर याच्या एका कमेंटवरून नेटकऱ्यांनी पाकिस्तानी संघाला धारेवर धरलं. शोएब अख्तर पाकिस्तानच्या अतिम फेरीत प्रवेश करण्याच्या शक्यतांबद्दल चर्चा करत होता. या संभाषणादरम्यान त्याने चुकून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चन असे म्हटले होते.
शोएब अख्तरने चुकून अभिषेक बच्चनचे नाव घेतल्यानंतर सूत्रसंचालक आणि इतरांनी त्याला दुरूस्त केले. ‘तुला अभिषेक शर्मा म्हणायचे आहे का?’, असे सांगितल्यानंतर स्टुडीओमध्ये हशा पिकला. त्यानंतर शोएब अख्तरने चूक सुधारत अभिषेक बच्चन नाही तर अभिषेक शर्मा म्हणायचे होते, असे स्पष्ट केले.
त्यानंतर अभिषेक बच्चननेही पाकिस्तान संघाची फिरकी घेतली होती. त्यांना हेही शक्य होणार असं म्हणताना अभिषेकने एक्सवर पोस्ट केले की, ““सर, आदर ठेवून सांगतो. ते एवढंही करू शकणार नाहीत. मी क्रिकेट फारसा चांगला खेळत नसलो तरी.”
दरम्यान, कालचा सामना भारताने जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीदेखील पाकिस्तानी संघाला ट्रोल केलं आहे. त्यांनी त्यांच्या खास विनोदबुद्धीने पाकिस्तानी संघावर टीका केली आहे. बिग बींनी एक्सवर लिहिले आहे की, “जिंकलो… अभिषेक बच्चन चांगला खेळला… तिकडे तोंड चालवल आणि इथे फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण… शत्रूला हलवून टाकलं. बोलती बंद. जय हिंद… जय भारत… जय माँ दुर्गा…”
यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना मोहब्बतें मधील अमिताभ यांच्या प्रसिद्ध डायलॉगवर मीम्स शेअर केले आहेत. पाकिस्तान हरल्यानंतर त्यांची हार कशी कायम राखली यावर नेटकऱ्यांनी पाकिस्तानी संघाला चांगलंच झोडपून काढलं.
आणखी एका युजरने म्हटले की, आता या शेजाऱ्यांना कळलं असेल की, “बिग बींशी पंगा घेणं तर दूरच, पण पाकिस्तानसाठी ज्युनियर बच्चनच पुरेसे आहेत”. तर आणखी एका युजरने “Let BIG B cook” अशी कमेंट दिली आहे.
अमिताभ बच्चन यांचे चाहते जगभरात आहेत. ते त्यांचा बहुतेक वेळ कामात घालवत असले तरी ते एक क्रिडाप्रेमी आहेत आणि बहुतेकदा ते भारताचे सामने चुकवत नाहीत. दरम्यान, आशिया कप जिंकून आणि त्यातही पाकड्यांकडून ट्रॉफी नाकारून भारतीय संघाने असंही भारतीय चाहत्यांचं मन जिंकलंच आहे. पण आता सोशल मीडियावरही पाकिस्तानचा मुजोरपणा उतरवण्याचा निर्धारच जणू चाहत्यांनी केला आहे.