Atal Setu First Accident Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात उद्घाटन झालेल्या अटल सेतूवर पहिलाच अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. शिवडी न्हावा शेवा अटल सेतुवर रविवारी दुपारी ३ वाजता पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आठवड्याभरात पहिला अपघात झाला आहे. हे वाहन उरणच्या चिर्लेकडून मुंबईकडे जात असताना हा किरकोळ अपघात झाला होता. पुलावर उरणच्या दिशेने १२ किलोमीटर अंतरावर एका वाहनाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाच्या मधल्या दुभाजकाला धडक दिली. या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार, हे वाहन एक महिला चालवत होती व तिच्यासह एक पुरुष व लहान मूल होते. सुदैवाने या तिघांनाही या अपघातात गंभीर दुखापत झालेली नाही.
सदर व्हिडीओ हा अटल सेतूवर अपघात झालेल्या गाडीच्या बाजूने जाणाऱ्या एका वाहनातून शूट करण्यात आला होता. या कारने महामार्गावरील इतर कोणत्याही कारला धडक दिली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. अपघातग्रस्त तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ट्रान्सहार्बर लिंक रोडवरील हा पहिला अपघात आहे ज्याचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी करण्यात आले आणि १३ जानेवारीपासून यावरून वाहतूक सुरु झाली होती.
दरम्यान, पुलावरील वेग मर्यादा १ ०० किमी प्रतितास आहे. अपघात झालेली गाडी वेगमर्यादा पाळत होती का हे अद्याप समजलेले नाही. अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या अंतर्गत या सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे ४०० कॅमेरे बसविण्यात आले आहे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने या कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार आहेत.
हे ही वाचा<< मुंबई: १८ हजार कोटींच्या ‘अटल सेतू’ची पहिली झलक; मोदींनी दाखवला भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचा Video
दुसरीकडे, अटल सेतूवर चक्क तीन चाकी म्हणजे, रिक्षा धावत आल्याचा एक फोटो सुद्धा काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. बरेच प्रवासी या पुलावर गाड्या बाजूला लावून फोटो काढत असल्याचे, व्हिडीओ बनवत असल्याचे दृश्यही सतत ऑनलाईन पाहायला मिळत आहे. अगदी एक-दोन दिवसांमध्येच नागरिकांच्या अशा वागण्यामुळे, या पुलावर कचरा आणि पान-गुटखा खाऊन थुंकल्याच्या खुणा पाहायला मिळाल्या होत्या. नियमांचे पालन न केल्यास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प किती दिवस तितकाच भव्य दिव्य राहील हा प्रश्नच आहे.