सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी जोरादर प्रचार सुरू असुन, प्रचार संपण्यासाठी अवघा एक दिवसाचाच कालवधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर मतदारराजाला खुश करण्यासाठी व जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून पुर्णपणे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे विविध पक्षांसह उमेदवार आपल्या प्रचारात नवनवीन हटके प्रचारगीतांचा वापर करत आहेत. आतापर्यंत शिवसेना, भाजपा या पक्षांसाठी प्रचारगीत गायल्यानंतर आता लोकप्रिय मराठी संगीतकार – गायक अवधूत गुप्ते यांनी आपल्या धडाकेबाज शैलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाठी देखील हटके प्रचारगीत तयार करून ते गायल्याचे समोर आले आहे.
अवधूतने गायलेल्या या प्रचारगीतात बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरच्या विकासासह त्यांनी पक्षाच्या माध्यामातून केलेली कामगिरी दाखवण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या जनसंपर्काबाबतही बोलले गेले आहे.
”एका बाजूला नाशिक-शिर्डी, एका बाजूला पुणे-नगर.. जणू पाचूच्या कोंदणामंदी, कोणी हिरा जडावा सुंदर…एक गाव आहे टपोरं , त्याचं नाव.. संगमनेर…” असं संगमेनरच वर्णन करत या प्रचारगीताची सुरूवात करण्यात आलेली आहे. तर याच्यापुढे ”संगमनेरच्या विकासामागे कारण आहे जो ‘हात’… संगमनेरची जनताच म्हणते इस बंदे मे है कुछ बात…ये बंदा लई जोरात… बाळासाहेब थोरात….” असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची स्तुती करण्यात आली आहे.
हे प्रचारगीत अवधुत गुप्ते यांनी स्वतः लिहिलं, बसवलं व गायलं देखील आहे. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शिवसेनेने साहेबराव नवले यांना उमदेवारी दिली आहे. अवधूत गुप्ते यांनी महायुतीतील दोन्ही पक्षांसोबतच आघाडीसाठीही प्रचारगीत गायलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी गाणं गाताना फरक असावा लागतो, असं भाजपच्या प्रचारगीताच्या अनावरणावेळी गुप्ते म्हणाले होते.