आई होणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. मात्र शारीरिक कमतरता किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे बहुतेक महिला मुलाला जन्म देण्यास सक्षम नसतात. अशावेळी त्या सरोगसी पद्धतीचा वापर करून आई होऊ शकतात. आजकाल सरोगसी पद्धतीची निवड करणाऱ्या जोडप्यांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
आपण सोशल मीडियावर सरोगसीशी निगडित अनेक घटना वाचतो. सध्या अशीच एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. पीपलमध्ये देण्यात आलेल्या एका अहवालानुसार अमेरिकेतील एका आईने सरोगेट बनून आपला मुलगा आणि सुनेच्या बाळाला जन्म दिला आहे. या अहवालात सांगितलंय की या महिलेच्या सुनेला गर्भाशयाचा काही भाग काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. यानंतर या जोडप्याकडे पालक बनण्यासाठी सरोगसी पद्धतीचा विचार करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता.
यावेळी जेफ हॉकच्या ५६ वर्षीय आई नॅन्सीने त्यांना सरोगेट म्हणून राहण्यास तयार असल्याचा पर्याय सुचवला. दरम्यान, ही गोष्ट त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली आणि नॅन्सीने वयाच्या ५६ व्या वर्षी मुलीला जन्म दिला.
पेशाने वेब डेव्हलोपर असणाऱ्या जेफने पीपलला सांगितले, ‘हा अतिशय सुंदर क्षण आहे. किती लोकांना आपल्या आईला जन्म देताना पाहायला मिळते?’ दरम्यान, मुलीला जन्म दिल्यानंतर नॅन्सी नव्या भावनांचा सामना करत आहेत. नॅन्सी यांनी सांगितले, ‘ही यावेळी मी आनंद आणि वियोगाचे दुःख अशा मिश्र भावनांचा अनुभव घेतेय.’ या मुलीच्या आजीला म्हणजेच नॅन्सीचा आदर म्हणून या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ‘हॅना’ असे ठेवले आहे.