जेसन बेहेरनडॉर्फ आणि मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला, यासोबतच उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. विजयासाठी दिलेल्या 286 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा अख्खा संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या प्रभावी आक्रमणासमोर 221 धावांतच आटोपला. जेसन बेहरनडॉर्फनं 44 धावांत पाच आणि मिचेल स्टार्कनं 43 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स वगळता एकही फलंदाज मैदानावर लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. स्टोक्सने एकट्याने 89 धावांची झुंजार खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच या दोघांनी दमदार फलंदाजी करत 123 धावांची भक्कम सलामी दिली. फिंचने शानदार शतक झळकावत 116 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 100 धावा केल्या. तर दमदार फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरनेही अर्धशतक झळकावत 61 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 53 धावा ठोकल्या. पण या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने टाकलेल्या याॉर्कर चेंडूंची. अशाच एका अप्रतिम यॉर्करवर स्टार्कने इंग्लंडच्या विजयाची शेवटची आशा असलेल्या स्टोक्सचा त्रिफळा उडवला, आणि सामन्याचं पारडं आपल्या बाजूने झुकवलं. 89 धावांवर खेळताना स्टोक्स इंग्लंडला सामना जिंकून देऊ शकतो असं वाटत असतानाच मिचेल स्टार्कच्या एका यॉर्कर चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. स्टार्कने टाकलेला हा यॉर्कर इतका भेदक होता की हवेत वळण घेऊन झपकन आत घुसल्यानंतर टप्पा पडून चेंडू अखेरच्या क्षणी काटा वळवतो आणि स्टोक्सच्या ऑफस्टंपची दांडी गुल होते. यानंतर सोशल मीडियावर स्टार्कच्या या चेंडूची तुफान चर्चा सुरू झाली आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी आणि क्रिकेटप्रेमींनी हा या वर्ल्डकपमधील सर्वोत्कृष्ट चेंडू असल्याचं म्हटलं आहे. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी स्टार्कने स्टोक्सला टाकलेला यॉर्कर सर्वोत्कृष्ट यॉर्करपैकी एक आहे, या चेंडूने ऑस्ट्रेलियासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडले असं म्हटलं आहे. आयसीसीनेही हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यावर क्रिकेट वर्ल्ड कपच्या अधिकृत अकाउंटवरुन हा यंदाच्या विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट चेंडू आहे का असा प्रश्न विचारला आहे? सोशल मीडियातून याबाबत निरनिराळ्या प्रतिक्रिया येत असून अनेक जणांनी कुलदिप यादवने ज्या चेंडूवर बाबर आझमला बाद केलं तो सर्वोत्कृष्ट होता असं म्हटलं आहे, तर अनेकांनी वासिम अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर यांनी टाकलेल्या यॉर्करचे दाखले दिले आहेत. तर काहींनी बुमराह हाच सर्वोत्तम यॉर्कर टाकतो असं मत व्यक्त केलं आहे.
पाहा व्हिडिओ –

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ball of the world cup watch mitchell starcs stunning yorker that castled stokes in australias big win sas
First published on: 26-06-2019 at 09:47 IST