सोशल मीडियामुळे अनेक लोकांचे आयुष्य काही क्षणात पालटलं आहे. याबाबतच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आणि पाहिल्यादेखील आहेत. कारण सोशल मीडियाच्या या ओपन फ्लॅटफॉर्मवर अनेकांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळत असते. शिवाय जर एखाद्या व्यक्तीमधील नेटकऱ्यांना आवडलं तर तो व्यक्ती फेमस होतो. मग त्यामध्ये काही लोक भन्नाट डान्स करुन तर कोणी गाणं म्हणून फेमस होत असतात.
सध्या सोशल मीडियावर अशाच एक व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर तो व्हायरल होण्याला कारणीभूत ठरली आहे एक टोपली. हो कारण या व्यक्तीने एका टोपलीची रचना अशा प्रकारे केली आहे की, त्यापासून १३ प्रकारच्या वेगवेगळ्या टोपल्या बनवता येत आहेत. त्याची ही कला पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
कारण, या व्यक्तीने बनवलेल्या एका टोपलीत १३ वेगवेगळी डिझाइन्स आहेत, ज्या तुम्ही गरजेनुसार आणि इच्छेनुसार बदलू शकता. ही भन्नाट डिझाइनची टोपली बनवणाऱ्या व्यक्तीचं नाव नवाब पाशा असल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्याने बनवलेली अप्रतिम टोपली १३ वेगवेगळ्या आकारात बदलू शकते. बेंगळुरूमधील टिपू सुलतान राजवाड्याबाहेर नवाब या टोपल्या विकतो.
या टोपलीचा अप्रतिम व्हिडिओ १३ एप्रिल रोजी @Masterji_UPWale नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “एका बास्केटमध्ये १३ डिझाइन्स. ट्विटर, या व्यक्तीला प्रसिद्ध कर.” सध्या या टोपली बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत तो १ लाख २३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर ११ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. ही टोपली पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. शिवाय टोपली बनवणाऱ्याचेही नेटकरी कौतुक करत आहेत. नेटकऱ्यांनी एका टोपलीमध्ये १३ टोपल्या, या बनवणाऱ्याने चांगला शोध लावला असून ती टोपली कुठे भेटेल अशी विचारणाही केली आहे.