ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुट्ट्या दिल्या जातात. त्यामध्ये सीक लिव्ह, ईएल आणि सीएलचा समावेश आहे. मात्र अनेकदा कामाच्या ताणामुळे थकलेले असतानाही ऑफिसकडून सुट्टी मिळत नाही. याचा परिणाम कामावर होतो, त्यामुळे ऑफिसमध्ये येऊन अनेक जण डुकल्या काढत राहतात. पण अचानक तुम्हाला ऑफिसने झोपण्यासाठी खास सुट्टी दिली तर तुम्ही काय कराल? हे वाचून तुम्हाला थोडं हसायला आलं असेल. पण अशी एक कंपनी आहे जिथे कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी खास एक दिवसाची अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही कोणती विदेशी कंपनी नाही तर भारतीय कंपनी आहे.

आज वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्ताने बंगळुरुमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ही अनोखी भेट दिली आहे. कामातून एक दिवस आराम मिळावा या उद्देशाने कंपनीने वर्ल्ड स्लीप डेनिमित्त कर्मचार्‍यांसाठी पर्यायी सुट्टी जाहीर केली आहे.

वेकफिट सोल्यूशन्स या D2C (Direct -to-consumer) होम अँड स्लीप सॉल्यूशन स्टार्टअप कंपनीकडून कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांना झोपेसाठी दिलेल्या सुट्टीच्या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलच्या सबजेक्टमध्ये कंपनीने ‘अनाऊंसिंग द गिफ्ट ऑफ स्लीप’ असं लिहिलं आहे. १७ मार्च या वर्ल्ड स्लीप डेनिमित्ताने कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना विश्रांती दिली आहे. यासोबत कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवारीही सुट्टी मिळाली आहे.

कंपनीने आपल्या ईमेलमध्ये लिहिले की, “वेकफिट आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवार, १७ मार्च रोजी ‘वर्ल्ड स्लीप डे’ हा दिवस ऐच्छिक सुट्टी म्हणून साजरा करेल हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. झोपेचे शौकीन म्हणून आम्ही स्लीप डे हा झोपेचा सण म्हणून साजरा करतो, खासकरून हा सण शुक्रवारी येतो. कर्मचारी एचआर पोर्टलद्वारे इतर सुट्टीप्रमाणे या सुट्टीचा लाभ घेऊ शकता.

कंपनीने पुढे लिहिले की, आमच्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्डच्या 6 व्या आवृत्तीत 2022 पासून कामाच्या वेळेत झोपेचा त्रास जाणवणाऱ्या लोकांमध्ये २१ टक्के आणि थकले असतानाही जागू काम करणाऱ्यांमध्ये ११ टक्के वाढ झाली आहे. अपुऱ्या झोपेचे प्रमाण लक्षात घेता स्लीप डे साजरा करण्यासाठी गिफ्ट ऑफ स्लीप पेक्षा करण्याचा कोणता चांगला मार्ग आहे?

गेल्या वर्षी या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘राईट टू नॅप पॉलिसी’ जाहीर केली होती. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत दुपारी ३० मिनिटे झोपण्याची मुभा देण्यात आली होती. कंपनीच्या मते, दुपारची झोप शरीराला रिचार्ज करण्यास आणि कामावर पुन्हा फोकस करण्यास मदत करते. यामुळे कामाची गुणवत्ताही सुधारते.