Karnataka Viral Video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडीओ समोर येत असतात. काही हसवणारे असतात, तर काही माणुसकीला काळिमा फासणारे. मानवी अत्याचार याचा प्रत्यय तर व्हिडीओ किंवा इतर पद्धतीने तर येतोच. मात्र जेव्हा एखादा निष्पाप प्राणी या मानवी क्रूरतेचा बळी ठरतो, तेव्हा ते आणखी भयानक ठरतं. कर्नाटकची राजधानी बंगळरूमध्ये अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इथे एका महिलेने एका लहानशा पाळीव कुत्र्‍याला मारहाण करून ठार केलं आहे.

लिफ्टमध्ये महिलेने नेमकं काय केलं?

ही घटना बंगळुरूच्या बागलूर भागात घडली. एका अपार्टमेंटमध्ये घरकाम करणारी पुष्पलता हिच्यावर ३१ ऑक्टोबर रोजी एका पाळीव कुत्र्याला निर्घृणपणे मरल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला कुत्र्यासह लिफ्टमध्ये प्रवेश करताना दिसते. अचानक ती कुत्र्याला सर्व ताकद एकवटून जोरात आपटते. त्याला बाहेर फेकते आणि अनेकदा हलवते. व्हिडीओमध्ये कुत्र्याला सतत हलवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही संपूर्ण घटना इमारतीच्या आणि लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

काही क्षणांनंतर कुत्रा कोसळतो आणि शेवटी त्याचा जीव जातो. हे दृश्य इतके हृदयद्रावक आहे की ते पाहणाऱ्यांना त्रासदायक वाटू शकते. व्हिडीओमुळे या सोसायटीमधील रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

महिलेविरूद्ध गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, पाळीव कुत्र्याच्या मालकाने या महिलेवर केस दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेविरूद्ध एफआयआर नोंदवला आहे आणि तपास सुरू आहे. या प्रकरणात प्राणी कल्याणकारी संघटनादेखील सक्रिय झाल्या आहेत आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. सोशल मीडियावरही याबाबत प्रचंड राग व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या महिलेला कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणीही अशा निष्पाप प्राण्यांवर अशी क्रूरता करण्याचे धाडस करू नये.